प्रश्‍न आहे लहान मुलांचा

जनशक्तीचे वृत्त संपादक अमित महाबळ यांचा विशेष लेख

भारताने भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यासाठी तपासणीची ही शिफारस आहे. ही चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जाणार आहे. तिसरी लाट सप्टेंबरच्या आसपास येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ही चाचणी लवकर होणे गरजेचे आहे. पुढील काही दिवसांत लसींशिवाय इतरही काही औषधे उपलब्ध होतील, असाही आशावाद ठेवण्यास हरकत नाही. आतापर्यंत ज्या काही चुका घडल्या आहेत, त्या यापुढेही होऊ नयेत याची काटेकोर काळजी केंद्र व राज्य सरकारने घेणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी लस आयात करावी लागली, तर त्यासाठीचा करार होणे अपेक्षित आहे. आताची ही वेळ राजकारण करण्याची नाही याचेही भानही राजकीय पक्षांनी ठेवणे गरजेचे आहे.

जग गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. पहिले काही दिवस तर या आजाराच्या विषाणूला आणि त्यावरील उपचार पद्धती माहिती करून घेण्यातच गेले. जरा आता कुठे ही महामारी आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत असताना भारतामध्ये तिसर्‍या लाटेची भीती निर्माण झाली आहे. गेल्या दोन लाटांचा अनुभव पाहता ती अनाठायी नाही. पहिली लाट आलेली असताना किंवा कोरोनाचा भारतामध्ये शिरकाव झालेला होता ते सुरुवातीचे दिवस पाहिले असता, लोकांमध्ये या नवीन महामारीविषयी प्रचंड दहशत होती. हळूहळू ती कमी होत गेली, रुग्णसंख्या कमी होत गेली तसे सरकारपासून ते जनतेपर्यंत बहुतेक सर्वच जण निर्धास्त झाले, बिनधास्तपणे वागू लागले. कोरोना हद्दपार झाला, अशी गैरसमजूत करून घेतली आणि या सर्वाची जबर किंमत दुसर्‍या लाटेमध्ये भारताला मोजावी लागली आणि आजही द्यावी लागत आहे. रुग्णसंख्या एवढ्या झपाट्याने वाढली की, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होईनात. अत्यावश्यक औषधे, तसेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या समस्येतून मार्ग काढताना सरकारची चांगलीच दमछाक झाली. अजूनही स्थिती 100 टक्के सुधारलेली नाही. पहिल्या लाटेवेळीच यापुढे कोरोनासोबत जगण्याची सवय लोकांनी करून घ्यायला हवी, असे आवाहन केले गेले होते. त्याचा प्रत्यय आता येत आहे. कोरोेना समूळ जाणार नाही पण त्याला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. भारतामध्ये पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर, दुसर्‍या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिक तर तिसर्‍या टप्प्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले गेले पण एकाही गटात 100 टक्के उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. यामध्ये लाभार्थींच्या तुलनेत लसींचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध असणे ही मुख्य अडचण आहे. परवापर्यंत देशात 16 कोटी जनतेचे लसीकरण झालेले होते. लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच कोरोनाची दुसरी लाटही उतरणीला लागली आहे. पण वेगवेगळ्या अहवालातून तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला असून, या लाटेमध्ये लहान मुलांना सांभाळणे अधिक महत्त्वाचे असेल, असा सावधगिरीचा सल्लाही दिला गेला आहे. ही लाट नेमकी केव्हा येऊ शकते, ती किती परिणामकारक असेल याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत पण गेल्याच आठवड्यात आंध्र प्रदेशात नवीन स्ट्रेन सापडला आहे की, जो आताच्या विषाणूपेक्षा आणखीन वेगाने फैलावतो. त्यामुळे अनेकांनी तिसर्‍या लाटेची धास्ती घेतली आहे. या संभाव्य लाटेपासून मुलांचा बचाव करण्याला प्राथमिकता असायला हवी. कारण, सर्वाधिक धोका हा त्यांना असणार आहे यावर सर्वांचेच एकमत आहे. तिसरी लाट ही लहान मुलांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे केंद्र सरकार व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन प्राणवायू खाटांची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे खाटा व उपचाराची रचना करताना प्रत्येक राज्याला वेगळी व्यवस्था करावी लागणार आहे. तिसर्‍या लाटेच्या अहवालांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी केंद्र सरकारला विचारणा केली होती की, लहान मुले बाधित झाल्यास त्यांच्या पालकांनी काय करायचे, (तिसर्‍या लाटेला तोंड देण्याची) तुमची तयारी काय आहे, कुठवर झाली आहे ? न्यायालय गंभीर आहे. सरकार प्रयत्न करीत आहे. पूर्वानुभव आणि जगातील इतर देशांचे तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न पाहता भारतानेही आता लहान मुलांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना फाइजर बायोएनटेकची लस टोचण्यास मंजुरी दिली आहे. आतापर्यंत 16 वर्षांवरील वयोगटात लस दिली जात होती. 12 ते 15 वर्ष वयोगटाचे लसीकरण पूर्ण होताच अमेरिकेतील शाळा व इतर शैक्षणिक संस्था उघडण्याचा रस्ता मोकळा होणार आहे. दरम्यान, अमेरिकेच्याही आधी लहान मुलांच्या लसीकरणाला कॅनडाने मंजुरी दिली आहे. अशा प्रकारची मंजुरी देणारा हा देश जगातील पहिला आहे. भारताने भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यासाठी तपासणीची ही शिफारस आहे. ही चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जाणार आहे. तिसरी लाट सप्टेंबरच्या आसपास येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ही चाचणी लवकर होणे गरजेचे आहे. पुढील काही दिवसांत लसींशिवाय इतरही काही औषधे उपलब्ध होतील, असाही आशावाद ठेवण्यास हरकत नाही. आतापर्यंत ज्या काही चुका घडल्या आहेत, त्या यापुढेही होऊ नयेत याची काटेकोर काळजी केंद्र व राज्य सरकारने घेणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी लस आयात करावी लागली, तर त्यासाठी करार होणे अपेक्षित आहे. आताची ही वेळ राजकारण करण्याची नाही याचेही भानही राजकीय पक्षांनी ठेवणे गरजेचे आहे. लोकांना राजकारणापेक्षा आपला जीव, आपले कुटुंब अधिक महत्त्वाचे आहे. त्यांना सरकार वार्‍यावर सोडू शकत नाही.