कोरोनापेक्षा भुकेने मरण्याची भीती

चाळीसगाव: कडकडीत टाळेबंदीत भिक मागून खाणाऱ्या कुटुंबांचा विचार करण्यात न आल्यामुळे कोरोनापेक्षा भुकेने मरण्याची परिस्थिती अनेक कुटुंबावर ओढावली आहे. असच एक कुटुंब तालुक्यातील पातोंडा येथे वास्तव्यास आहेत. परिवार हा भिक मागून पोट भरत असताना गेल्या तीन दिवसांपासून कोणीही भीक न घातल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यातील पातोंडा येथील गोकुळ प्रभात भिल याला पत्नीसह तीन मुले आहेत. जन्मताच तीन्ही मुले हे अपंग आहेत. भुमिहीन असल्याने हे दाम्पत्य हातमजुरी करून आपले उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान कडकडीत टाळेबंदी पुकारण्यात आली आणि या परिवाराचे जगणेच असह्य होऊन गेले. हातातील काम गेल्याने घर कसा चालवावा हा पेच कुटुंबांसमोर निर्माण झाला. आणि शेवटचा पर्याय म्हणून भिक मांगायला सुरूवात केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ह्या कुटुंबाचे खूप हाल झाले. आता दुसऱ्या लाटेत त्याची पुनरावृत्ती होत आहे. पदरात तीन मुले मुलगी मोनाली भिल (वय-२४), मुलगा विरू भिल (वय-१७) व ११ वर्षाचा तिसरा मुलगा हे तीनही मुले अपंग आहे. कोरोनाच्या या भयंकर काळात काही सामाजिक भावनेतून सदर कुटुंबाला मदत केली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोणीही भीक न घातल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सदर कुटुंबाविषयी कळताच स्वयंदिप फाउंडेशनच्या संस्थापिका मिनाक्षी निकम यांनी पातोंडा येथे धाव घेऊन मानसिक आधार दिला. यावेळी मिनाक्षी निकम यांनी सामाजिक कार्यकर्ता, संस्था व शासनास आवाहन केले असून जास्तीत जास्त जणांनी सामाजिक भान जोपासत हि मदत करावी अशी आग्रहाची विनंती केली आहे.