18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करावी

राज्य शासनाने 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात 1 मे पासून लसीकरणास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील 2 हजार 841 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी या वयोगटातील नागरीकांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते.तर 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून लसीच्या उपलब्धतेनुसार जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खासगी रुग्णालयात नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास नागरिकही स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन लस घेण्यासाठी पुढे
येत आहे.
18 ते 44 वयोगटात मर्यादित स्वरूपात व फक्त आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारे लसीकरण सुरू आहे, यात लसीकरण केंद्रावर नोंदणीचा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे नोंदणी व लसीकरण केंद्रावर या वयोगटातील नागरिकांनी संयम बाळगून आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करणेत येत आहे. याशिवाय नियमित शासकीय केंद्रांवर 45 हुन अधिक वय असणार्‍या नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. यात दुसर्‍या डोससाठी पात्र नागरिकांना वेगळा कोटा देण्यात येत आहे.

जिल्ह्यात तीन लाख लाभार्थ्यांचे लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 998 नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 59 हजार 108 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्याला जास्तीत जास्त लसीचा साठा मिळावा यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-19 नोडल अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Copy