चार वर्षात रक्कम दुप्पटीचे आमीष; फसवणूक झाल्याचे कळताच सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा मृत्यू

जळगाव- चार वर्षांत पैसे दुप्पट देण्याचे आमीष देत एका बनावट इन्शुरन्स कंपनीच्या दोन जणांनी सेवानिवृत्त कृषी सहाय्यक रमेश देवरे (रा. खोटेनगर) यांना 33 लाख 20 हजार 752 रुपयांत ऑनलाइन फसवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांचा मृत्यू 8 मार्च रोजी झाला. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रमेश देवरे हे ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्रात सहाय्यक पदावर कार्यरत होते. त्यांच्याशी सन 2014 मध्ये गौरव शर्मा व अग्रवाल या बनावट नावाच्या व्यक्तींनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी ‘लाइफ प्लस इन्शुरन्स’ कंपनीतून बोलत असल्याच सांगितले. पॉलिसीत पैसे गुंतवल्यास चार वर्षांंमध्ये दुप्पट रक्कम मिळेल, असे आमीष दोघांनी दिले. देवरे यांनी सुरुवातीला दोन लाख रुपये गुंतवले. दोघांनी बनावट कागदपत्र पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळी फी, खर्च आदीचे कारण सांगून दोघांनी वेळोवेळी पैशांची मागणी केली.
देवरे यांनी फेब्रुवारी 2021 पर्यंत म्हणजे सहा वर्षांत दोघांना ऑनलाइन 33 लाख 20 हजार 752 रुपये पाठवलेे. देवरे सन 2013 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम त्या दोघांना पाठवली होती. त्यांनी पैसे भरल्यानंतर ती रक्कम परत कधी मिळणार याची विचारणा वेळोवेळी केली. मात्र, भामट्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. देवरे यांचा फोन घेणे देखील दोघांनी फेब्रुवारी 2021 मध्ये बंद केले. आपली फसवणूक झाल्याची खात्री देवरे यांना झाली. याबाबतच्या तणावातून त्याचे निधन 8 मार्च 2021 रोजी झाले.
कुटुंबीयांनी देवरे यांच्या काही पॉलिसींची माहिती घेतली. त्यांच्या खात्यातून वेळोवेळी 33 लाख रुपये ऑनलाइन पाठवण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. देवरे यांनी तीन लाख रुपये गुंतवल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. मात्र, त्यांनी यानंतर पाठवलेल्या पैशांबाबतची माहिती कोणालाही सांगितली नव्हती. आता हा प्रकार उघडकीस येताच त्यांचे कुटुंबीय सुद्धा तणावात आहेत. मुलगा सुनील देवरे यांनी माहिती गोळा केली असता वडिलांना कोणीतरी फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात सुनील देवरे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गौरव शर्मा व अग्रवाल (बनावट नावे) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.