बियर दिली नाही म्हणून हॉटेलच्या मालकाला मारहाण

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील परमीट रुम बीयरबारसह इतर दुकानांना वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार हॉटेल बंद झाल्यावर आलेल्या तरुणांनी मालकाला बियर मागितली. बियर न दिल्याच्या रागातून तरुणांनी हॉटेलसमोर बियरसह दारुच्या बाटल्या फोडून हॉटेलच्या मालकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

मारहाण केल्यावरही तरुण थांबले नाहीत, त्यांनी दहशत माजवित मालकाला खून करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी हॉटेल मालकाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कानळदा रोडवरील हरिओम नगरातील रहिवासी चेतन गोपाळ साळी (रा.हरिओम नगर, कानळदा रोड) यांचे आव्हाणे शहरात हॉटेल लक्ष्मी नावाचे बियरबार आहे. शुक्रवारी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर धार्या भगत (रा.के.सी. पार्क), मयूर भावसार (रा. खडके चाळ) व अन्य तीन ते चार तरुण हॉटेलवर आले.त्यांनी मालक साळी यांना बियर मागितली. मात्र साळी यांनी तरुणांना हॉटेल बंद झाली असल्याचे सांगितले. त्याचा राग आल्यावर तरुणांनी हॉटेलसमोर बियरसह दारुच्या बाटल्या फोडल्या. व तरुण निघून गेले.

तरुण निघून गेल्यानंतर चेतन साळी हे घराकडे निघाले. तरुणांनी साळी यांना के.सी पार्क जकात नाक्याजवळ अडवून पुन्हा आत्ताच हॉटेलातून बियरच्या बाटल्या काढून देण्याची मागणी केली. त्यावर साळी यांनी आता दुकान उघडता येणार नाही असे सांगितले सर्वांनी त्यांना मारहाण केली. खिशातील २५ हजार रुपये काढून घेतले. अरेरावी करत साळी यांना खून करण्याची धमकीही दिली. साळी यांनी प्रकाराबाबत भाऊ अमोल व योगेश यांना माहिती दिली. दोघेही त्याठिकाणी आले. संबंधित तरुणांना पैसे परत मागितले असता, संबंधितांनी त्यांचे आणखी काही मित्र बोलून दहशत माजवली. व आम्हाला रोज दोन बियर फुकट देण्यासाठी दमबाजी केली. याचवेळी तरुणांनी साळी, त्यांचे भाऊ व प्रिया साळी यांनाही मारहाण केली. याप्रकरणी चेतन साळी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.