शिवाजीनगरात माजी महापौराच्या मुलाचा खून

0

जळगाव – येथील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीच्या पुढे उस्मानिया पार्क जवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे वय २८ याचा बुधवारी रात्री 11:30 च्या सुमारास ४ ते ५ जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

लहान भावासह गाडीवर हल्ला झाला
राकेश याच्या मोठ्या भावाने बुधवारीच नवीन गाडी घेतली. ही नवीन गाडी घेऊन राकेशचा लहान भाऊ शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ उस्मानिया पार्ककडुन जात असतांना चार ते पाच संशयितांनी गाडी थांबविली व काही कळण्याच्या आत आसारीने गाडीवर हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळाल्यावर राकेश याठिकाणी पोहोचला असता संशयितांनी त्याच्यावरही आसारीने तसेच धारदार शस्त्राने वार केले . गंभीर अवस्थेत राकेश यास पारखनगरातील ओम क्रिटिकल केअर सेंटर मध्ये उपचारासाठी आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली अाहे. दरम्यान रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली असुन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांचे पथक लागले कामाला

प्राथमिक चौकशीत गणेश व भुर्या या दोन जणांनी धारदार शस्त्र व लोखंडी सळईने हा खुन केल्याचे माहिती पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. संशयितांच्या शोधार्थ शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे

 

गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान

कालच शहरात कानळदा रस्त्यावर वृध्दाला चाकुचा धाक दाखवून सव्वाचार लाख रुपये लुटल्याची घटना ताजी असतानाच माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याच्या खुनाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असल्याचे बोलले जात असुन बदलून आलेल्या व येणाऱ्या नवीन पोलिस अधिकार्‍यांना गुन्हेगारांनी एकप्रकारे रोखण्याचे आव्हान दिले आहे