राष्ट्रवादी महानगरच्या स्वागत कार्यक्रमावर जिल्हा नेत्यांची नाराजी

0

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर आघाडीतर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि ॲड. रोहिणी खडसे यांच्या स्वागताचा कार्यक्रम आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाविषयी राष्ट्रवादी महानगर कडून कुठल्याही बड्या नेत्याला विश्वासात घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अशा स्वागताच्या कार्यक्रमाबाबत आपल्याला विचारले गेले नसल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले.
मुंबई येथे राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथराव खडसे व ॲड. रोहिणी खडसे यांचे आज जळगावात आगमन झाले. आज सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर आघाडीतर्फे खडसेंच्या स्वागताचा कार्यक्रम आकाशवाणी चौकातील पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाची दस्तुरखुद्द जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांना देखील माहिती नसल्याचे समोर आले आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉक्टर सतीश पाटील, अरुणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ, आमदार अनिल पाटील राष्ट्रवादीतील बडे नेते यांनाही याबाबत माहिती नसल्याचे विश्वासात घेतले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महानगरच्या स्वागताच्या कार्यक्रमावर जिल्हा नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ॲड. रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की काल रात्री साडेनऊ वाजता अभिषेक पाटील यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की सकाळी कार्यक्रम आहे मात्र कार्यक्रम ठरवतांना कुठलीही विचारपूस किंवा माहिती दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. खडसेंच्या पहिल्या स्वागताच्या कार्यक्रमाला बड्या नेत्यांची अनुपस्थिती दिवसभर चर्चेचा विषय ठरली.
देवकर समर्थकांची नाराजी
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाबाबत देवकर समर्थकांना देखील माहिती नव्हती. देवकर समर्थकांनी खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी महानगरच्या कार्यक्रमाबाबत देवकर समर्थकांमध्येही नाराजी असल्याचे समोर आले आहे.