भुसावळात पहिल्याच जनता कर्फ्यूला प्रतिसाद

0

भुसावळ : भुसावळात सातत्याने वाढत असलेली कोरोनाची सापखळी तोडण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आठवड्यातून शनिवारी व मंगळवारी दोन दिवस स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुषंगाने मंगळवारी जनता कर्फ्यूचा पहिलाच दिवस असल्याने त्यास नेमका प्रतिसाद कसा मिळेल ? याबाबत साशंकता असलीतरी व्यापार्‍यांनी मात्र स्वयंशिस्तीचे दर्शन घडवत कडकडीत व्यवसाय बंद ठेवले मात्र सकाळच्या वेळी काही केळी विक्रेत्यांसह रेस्टारंट चालकाने हॉटेल उघडल्याने त्यास तंबी देण्यात आले तर काहींनी बेशिस्तीचे दर्शन घडवत विनाकारण रस्त्यावर वाहने आणल्याचे चित्र होते. पोलिसांनी मात्र विनाकारण फिरणार्‍यांना खडे बोल सुनावत माघारी पाठवले.

मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट
शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखअसलेल्या जामनेर रोड, मॉडर्न रोड, अप्सरा चौक, कपडा बाजार, नृसिंह मंदिर मार्ग, गांधी चौक, सराफ बाजार आदीसह आठवडे बाजार, भाजीबाजार, फ्रुट मार्केट आदी सर्वच बाजारपेठेतील दुकाने बंद होती. असे असलेतरी दवाखाना तसेच अन्य किरकोळ कामे सांगून नागरीक विनाकारण वाहनांवरून बाहेर पडत असल्याने दिवसभर शहरातील रस्त्यांवर गर्दी दिसून आली. नाहक फिरणार्‍यांनी जनता कर्फ्यूत सहभाग होणे गरजेचे असताना तसे न झाल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

विक्रेत्यांना पथकाची तंबी
मंगळवारी सकाळी शहरातील भारत मेडीकल व यावलरोड भागात दोन ठिकाणी हात गाडीवरुन केळी विक्री होत असल्याचे कळताच पोलिसांनी संबंधिताना घरी पाठवले तसेच जुन्या नगरपालिका परीसरातील एका रेस्टॉरंट चालकाने दुकान उघडल्यानंतर त्यास तंबी देवून दुकान बंद करण्यास भाग पाडण्यात आले. दरम्यान, यावल रोड, जामनेर रोड, जळगाव मार्ग, खडकारोड, स्टेशनरोड या मार्गावर विनाकारण वाहन धारक फिरताना आढळले. अनेकांना पोलिसांनी तंबी देत आल्या पावली माघारी पाठवले.