तुमचे देशसेवेसाठीचे त्याग, समर्पण अतुलनीय: मोदींनी वाढविले जवानांचे मनोबल

0

लेह: गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर सीमेवर तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाखमधील निमो येथे जाऊन जावनांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी जवानांचे मनोबल वाढविले. तुमचे शौर्य, तुमची हिंदी आणि भारतमातेच्या रक्षणासाठी तुम्ही करत असलेलं समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठिण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. तुमचं साहस, तुमचं शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षा मोठं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तुमचे बाहु इथल्या पर्वतरांगांसारखेच बळकट आहे. तुमची इच्छाशक्तीही अटळ आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. मी हा सगळा अनुभव घेतो आहे. त्याचंच प्रतिबिंब माझ्या भाषणात शब्दरुपाने उतरली आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं.

तसेच यावेळी मोदींनी सीमेवर कुरघोडी करणाऱ्या चीनला कडक शब्दात इशारा देखील दिला आहे.

संपूर्ण देशाला तुमच्या शौर्याबाबत प्रचंड अभिमान आहे. तुम्ही इथे आहात त्यामुळे तुमच्या बाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात एक अढळ विश्वास आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तसंच गलवान खोऱ्यात ज्या २० जवानांना शहीद व्हावं लागलं त्यांना आज मी पुन्हा एकदा आदरांजली वाहतो असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे

Copy