नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला पदभार !

0

नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला. लोकसभेचे 16 वे अध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजन यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर, 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून आज ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ओम बिर्ला यांना एनडीएससह, तृणमूल आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिर्ला यांच्या निवडीचा प्रस्ताव सादर केला होता.

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष डॉ. विरेंद्रकुमार यांनी ओम बिर्ला यांच्याकडे लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार दिला. ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच, एका सर्वसामान्य कार्यकर्ता, विद्यार्थी संघटनांपासून चळवळीत जोडलेला कार्यकर्ता ते लोकसभा अध्यक्ष असा ओम बिर्ला यांचा प्रवास असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवेळीही नेहमीप्रमाणेच चर्चेत नसलेला चेहरा समोर आणला आहे. कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आला. दरम्यान, खासदार बनण्यापूर्वी बिर्ला हे तीनवेळी दक्षिण कोटा मतदारसंघातून आमदार बनले होते. तर, पर्यावरणप्रेमी नेता अशी बिर्ला यांची ओळख आहे.

Copy