जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारपासून सावध रहा-अशोक चव्हाण

0

नंदूरबार येथे जनसंघर्ष यात्रेचे आगमन
नंदुरबार । साडेचार वर्ष भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता मात्र केली नाही, जनतेची फसवणूक आणि निराशा करणाऱ्या या सरकारपासून जनतेने सावध राहावे असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केले,नंदुरबारला दि 6ऑक्टोबर रोजी जनसंघर्ष यात्राचे आगमन झाले, त्यानंतर दुपारी चार वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सभा घेण्यात आली.

सभेला यांची होती उपस्थिती
या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.बाळासाहेब थोरात, आ.शरद रणपीसे, नसीम खान, काँग्रेसचे प्रवक्ते हुसैन दलवाई, सचिन सावंत, सुधीर तांबे, रत्नाकर महाजन, शोभा बच्छाव, राजू वाघमारे, प्रकाश सोनवणे, राजेश कोतवाल, रमेश श्रीखंडे, माजी खासदार माणिकराव गावित, माजी मंत्री तथा आमदार सुरुपसिंग नाईक, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, आमदार के.सी.पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, नंदुरबार पं.स.सभापती रंजना नाईक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, नंदुरबारचे अध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी आदी उपस्थित होते.

सोंग-ढोंग करणा-यांपासून सावधान- खा.चव्हाण
सभेत बोलतांना माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण म्हणाले की, जनत महागाईच्या खाईत ओढले जात आहे. साडेचार वर्षांच्या काळात भाजप सरकारने आतापर्यंत जनतेच्या हितासंदर्भात आश्वासनांची पूर्ती केलेली नाही. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांची हालअपेष्टा करीत आहे. तर आता न्याय पालिकेतही सरकार हस्तक्षेप करु पहात आहे. म्हणून आश्वासने व विविध घोषणांचा पाऊस पाडत जनतेची दिशाभूल करणार्‍या सोंग-ढोंग असलेल्या सरकारपासून जनतेने सावध रहावे, असा कानमंत्रही खा.चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

चार वर्षात केलेल्या कामांचे केले मंथन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शेतकरी उद्ध्वस्त होत असून अर्थव्यवस्थाही बिकट होवू लागली आहे. केंद्र व राज्य सरकारने खोटी आश्वासने दिल्यामुळे कृषी अर्थव्यवस्था 8.3 टक्यांनी घडली आहे. नोटबंदी करीत तब्बल तीन लाख कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. या नोटबंदीतून भाजप वाल्यांचे काळे पैसे पांढरे झालेत, असा आरोपही त्यांनी केला. तर राज्यातील महाविद्यालयांमध्ये एक लाख 60 हजार अभियांत्रिकी जागा असून केवळ सात हजार अर्ज आले आहेत, अशीही खंत त्यांनी व्यक्त करीत आता या सरकारच मुल्यमापन करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

महागाईबाबत भाजपावर डांगली तोफ
बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष वाढला आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढविल्याने अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. नंदुरबारहून काँग्रेसला भरपूर प्रेम मिळाले आहे. यापूढेही असेच राहू द्यावे, असे सांगितले. आ.शरद रणपीसे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भष्टाचार करायचा होता, म्हणून त्यांनी लोकपाल लागू केले नाही. रॉफेल व पेटीएम कंपनीया विदेशी असून त्यात भाजपाची गुंतवणूक होत आहे. नसीम खान म्हणाले की, मोदी व फडणवीस सरकार कुंभकर्णासारखी झोपली आहे. विकास, रोजगार अशा कुठल्याच विषयावर चर्चा होत नाही. तर प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले, सरकारच्या चार वर्षातील काळात महागाईने उन्माद माजविला आहे.