हरियाणात जाट आंदोलनाला हिंसक वळण

0

फतेहाबाद : हरियाणामध्ये पुन्हा एकदा जाट आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये उप-पोलीस अधीक्षक जखमी झाले आहेत. हरियाणामधील फतेहाबाद येथे जाट आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जाट नेत्यांना चर्चेसाठी बोलवले आहे. फतेहाबादमधील धन गोपाल या गावामध्ये पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे चिडून आंदोलकांनी पोलिसांवर दगडांचा मारा केला. त्यामध्ये डीवायएसपी गुरूदयाल सिंग जखमी झाले आहेत. फतेहाबादमध्ये काही ठिकाणी पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. तसेच आंदोलकांना पसरवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला.

त्याच वेळी दिल्लीतील जंतर मंतर येथे 1,000 च्या वर आंदोलकांनी निदर्शने केली. तर फतेहाबाद तसेच हरियाणातील इतर भागातून आंदोलक दिल्लीकडे येत होते. त्यामुळे दिल्लीकडे येणार्‍या रस्त्यांवर बॅरीकेड्स लावलेल्या होत्या. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पेट्रोल पंपांना खास सूचना देण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे, महामार्ग इत्यादी ठिकाणी पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे. तसेच ट्रॅक्टरमध्ये बसून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे हरियाणात अनेक ठिकाणी लोक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून दिल्लीकडे रवाना होऊ लागले होते.

त्यांना थांबण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, सोमवारपासून हरियाणामध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला कसे जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला न भिता जाता येईल, अशी आम्ही व्यवस्था करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर जाट आरक्षण संघर्ष समितीचे प्रमुख यशपाल मलिक यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्यासोबत 20-30 इतर जाट नेते देखील जाणार आहेत. जाट समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे म्हणून हरियाणामध्ये तीव्र स्वरुपाचे आंदोलन होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रश्न हरियाणामध्ये आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. रेल्वे रुळ उखडणे, महामार्ग अडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या घटना घडत आहेत.