12 वर्षीय बालिकेला रेल्वेतून फेकणार्‍या सैन्यातील जवानास भुसावळात अटक

भुसावळ : डाऊन गोवा एक्स्प्रेसमध्ये 12 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सैन्यातील एका जवानाने केल्यानंतर बालिकेने त्यास विरोध करताच बालिकेला धावत्या रेल्वेतून फेकून देण्यात आल्याची आदर्की ते वाठार स्टेशनदरम्यान सोमवारी मध्यरात्री दीड वाजता घडली होती. आरोपी जवानाला मंगळवारी दुपारी एक वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. प्रभू मल्लाप्पा उपहार (33, जि.बेळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

धावत्या रेल्वेतून फेकले होते बालिकेला
डाऊन गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या एस- 7 बोगीत प्रवास करीत असलेल्या एका कुटुंबातील बर्थवर झोपून असलेल्या 12 वर्षीय बालिकेला आरोपी उपहार याने शौचालयात नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र बालिकेला जाग आल्याने तिने आरडा-ओरड केली व आरोपीने तिला रडू नको, आई-वडिलांकडे सोडतो, असे सांगितले व तिला बाथरूमच्या बाहेर घेवून येत दरवाजा उघडून बाहेर फेकले. सुदैवाने गाडीचा वेग यावेळी ताशी 20 किलोमीटर असल्याने बालिका बचावली व स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर बालिकेने आपबीती सांगताच रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी सूत्रे हलवली.

भुसावळातून आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पुणे लोहमार्ग नियंत्रण कक्षातून झालेल्या घटनेबाबत लोहमार्ग पोलिसांना सूचित करण्यात आले. जळगावात गाडी आल्यानंतर जळगाव लोहमार्ग उपनिरीक्षक राजीव पाटील, हवालदार सचिन भावसार यांनी संशयीताचा शोध घेतला तर भुसावळ स्थानक आल्यानंतर संपूर्ण गाडीचे दरवाजे लावून संशयीताचा शोध घेण्यात आला. मिळालेल्या संशयीताच्या वर्णनावरून पोलिसांनी 25 जणांची बारकाईने पाहणी करीत त्यातील चौघांना ताब्यात घेत त्यांचे छायाचित्र काढून मिरज पोलिसांना पाठवून आरोपी कन्फर्म करण्यात आला व प्रभू मल्लाप्पा उपहार या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीत आरोपी उपहार हा लष्कराच्या झाशी युनिटमध्ये कार्यरत असून बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक सुरज सरडे, सहा.निरीक्षक परमेश्‍वर सोगे, उपनिरीक्षक सुनील इंगळे, एएसआय भरत शिरसाठ आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली. दरम्यान, अहमदनगर लोहमार्गचे पोलिस निरीक्षक बावस्कर व सहकार्‍यांनी मंगळवारी रात्री दोन वाजता त्यास ताब्यात घेतले.