115 केंद्रांवर पार पडली वाचन प्रेरणा अभियानाची परीक्षा

0

जळगाव : दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी २०१६ चे ‘आत्मविश्वास व वाचन प्रेरणा अभियाना’ अंतर्गत लेखी परीक्षेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्रभरात एकूण 115 केंद्रांवर ही परीक्षा उत्साहाच्या वातावरणात पार पडली. जळगाव, धुळे, नंदुरबार सह लातूर, नांदेड, मालेगाव, नाशिक, सटाणा, पुणे, वर्धा येथील विविध केंद्रांवर 7,118 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विशेष म्हणजे यावर्षी या अभियानात 2 अंध शाळा आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी देखील सहभागी झाले. अभियानांतर्गत ना नफा ना तोटा तत्वावर विद्यार्थ्यांना अत्यंत सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध केली होती. या पुस्तकांवर आधारित १०० गुणांची बहुपर्यायी, ताणमुक्त स्वरूपाची परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेसाठी ८ ते १० च्या विद्यार्थ्यांचा एक गट तर ११ वी, १२ वी आणि पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा एक गट केला होता. दीपस्तंभच्या १५० समन्वयक तसेच ४०० शिक्षकांनी या परीक्षेसाठी सहकार्य केले. 10 जानेवारी रोजी या परीक्षेचा निकाल घोषित केला जाईल.

अभ्यासपूर्ण सहलींचे बक्षीस
या परीक्षेत प्रथम येणाऱ्या ४० विद्यार्थ्यांसाठी बक्षीस स्वरूपात तीन दिवस भोपाळ परिसराची सहल आणि प्रज्ञाचक्षू आयएएस अधिकारी कृष्णगोपाल तिवारी तसेच अन्य अधिकाऱ्यांशी भेट व संवाद साधण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या ४० विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय पुणे एनडीए, आयुका, सी-डॅक, टेल्को, यशदा, सायन्स सेंटर व अधिकाऱ्यांच्या भेटी तर ८० विद्यार्थ्यांसाठी जळगाव येथे एक दिवसीय अनिवासी करियर व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येईल. यशस्वी ४०० विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात येतील. या परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

वाचनसंस्कार रुजावेत हा मुख्य उद्देश
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजावेत, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व सुसंस्कृत नेतृत्व निर्माण व्हावे या उद्देशाने दीपस्तंभच्या वतीने हे अभियान गेल्या पाच वर्षापासून राबविले जात आहे. अभियानाचे हे सहावे वर्ष आहे. आतापर्यंत या अभियानात लाखो विद्यार्थ्यांनी आणि अनेक शाळांनी सहभाग घेतला असून हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणादायी सहली, मार्गदर्शन आणि पुस्तकांचा लाभ मिळाला आहे. २०१६ च्या अभियानासाठी प्रज्ञाचक्षू आयएएस अधिकारी कृष्णगोपाल तिवारी यांचे दीपस्तंभ प्रकाशनाचे ‘फिटे अंधाराचे जाळे’ तर नोबेल विजेती मलाला युसुफझई संदर्भात संजय मेश्राम लिखित ‘सलाम मलाला’ ही दोन पुस्तके निवडण्यात आली होती.