11 महिन्यांनी मोठा दिलासा : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

Hundred Crore extortion case : Ex-Home Minister Anil Deshmukh granted bail मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 11 महिन्यांनी का असेना दिलासा मिळाला असून शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. असे असलेतरी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळाला नसल्याने तूर्त त्यांचा मुक्काम कारागृहात असणार आहे.

शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक
ईडीने अनिल देशमुखांना 100 कोटींच्या मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात अटक केली होती. अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. या कारवाईला 60 दिवस होऊन गेल्यामुळे नैसर्गिक हक्कानुसार जामीन मिळावा, असा अर्ज अनिल देशमुख यांनी आधी देखील कोर्टात जामीन अर्ज केला होता पण त्यावेळी विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल
ईडीने अनिल देशमुखांविरोधात 29 डिसेंबर 2021 रोजी सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांना ईडीने मुख्य आरोपी केले आहे. याआधी मुंबईतील 1750 बार, रेस्टॉरंट, हॉटेल आदी आस्थापनांकडून नियमित खंडणी वसुली करून दरमहा 100 कोटी रूपये जमा करून द्यायचे अशा स्वरुपाचा तोंडी आदेश देशमुखांनी एपीआय सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिरसिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या पत्राची दखल घेऊन मुंबईच्या उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयच्या चौकशीत मनी लाँड्रिंग झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले होते. यानंतर ईडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लेटर बॉम्बमुळे वाढली अडचण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली. पीएमएलए न्यायालयानं 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला अनिल देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं आहे. प्रकृता अस्वस्थाचं कारण तसेच वाढतं वय पाहता आपल्याला जामीन देण्याची विनंती देशमुखांकडनं करण्यात आली आहे. अनिल देशमुख हे 73 वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळलेला आहे, त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. याशिवाय त्यांना कोविड 19 ही होऊन गेलाय, या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकार शक्तीवर परिणाम झाल्यानं त्यांना सतत आधार आणि दुसर्‍याच्या मदतीवर अवलंबून रहावं लागतंय. त्यामुळे मनवतेच्या भावनेनं जामिनावर सोडण्याची विनंती देशमुखांनी हायकोर्टाकडे केली आहे.