100 दिवस पूर्ण झाले पण नोटाबंदीचे प्रश्‍न अनुत्तरितच

0

नवी मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असलेल्या 500 व 100 रुपयांच्या नोटांवर सरसकटबंदीचा निर्णय जाहीर करीत त्याची अंमलबजावणी झालेल्या घटनेस रविवारी (दि.26) 100 दिवस पूर्ण होत आहेत. या निर्णयाचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी टीका केली. मात्र, नोटाबंदीनंतर पहिले दीड- दोन महिने अनेकांना त्रास झाला. आपलेच पैसे बँकेत भरावे लागण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले तर पैसे काढण्यासाठी काही चकराही माराव्या लागल्या. या प्रकारात काही जणांचा जीव गेला. अनेकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागला. यापार्श्‍वभूमीवर नोटाबंदीनंतर सरकारचा कॅशलेसचा प्रयत्नही फसत असल्याचे व पंतप्रधानांनी याबाबत जनतेला स्पष्टीकरण न दिल्याची प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.

काळापैसा बाहेर काढणे, नकली नोटांवर प्रतिबंध आणणे आणि दहशतवाद्यांकडील पैशाला टाच येणे अशी प्रमुख कारणे पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना दिली होती. तसेच या निर्णयाबाबतची माहिती जनतेला 50 दिवसांत दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, यास किती यश आले, किती काळापैसा बाहेर आला, नकली नोटांवर खरेच निर्बंध आले का, दहशतवाद्यांकडील पैशाला टाच आली का, यांसह अन्य काही प्रश्‍न अनुत्तरित राहिले असून, जनमनातही त्याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळात काँग्रेस, शिवसेनेसह काही राजकीय पक्षांनीही मोदींच्या या निर्णयाविरुद्ध टीका केली.

दरम्यान, नोटाबंदी निर्णयाला 50 दिवस उलटल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेपुढे या निर्णयाच्या चांगल्या हेतूबद्दल माहिती जनतेला दिली नाही तसेच या निर्णयामुळे किती काळापैसा बाहेर आला? नकली नोटांना चाप बसला का? दहशतवाद्यांकडून भारतीय चलनाचा होणारा गैरवापर थांबला का? अशा प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आता 100 दिवसांनंतरही पंतप्रधान अपयशी ठरल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर देशभरात खळबळ माजली. या निर्णयाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी निर्णयाचे स्वागत केले असले, तरी त्यानंतर सामान्यांना कमालीचा त्रास झाला असल्याच्या बातम्या प्रसृत होऊ लागल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय म्हणजे टीकेचा विषय बनला. चलनातील 50 टक्क्यांहून अधिक पैसा या 500-1000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा झाला, तर लोकांना आपलेच पैसे पूर्ण स्वरूपात न मिळता किमान स्वरूपात व टप्प्याने काढावे लागल्याने त्यांना बँकांकडे अनेक फेर्‍या माराव्या लागल्या. या सार्‍यात त्यांचा वेळ आणि शक्ती खर्ची होऊ लागल्याने नोटाबंदीविरोधात लोकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला.

चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा उद्दिष्ट चांगला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार सांगते. मात्र, हा उद्दिष्ट साध्य झाला नाही, त्यात अपयश आले आहे हे नक्की. बनावट नोटा अतिरेक्यांकडे सापडल्या. डिजिटल व्यवहार मधल्या काळात बरे झाले. मात्र, आता ते कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे कॅशलेस ध्येयही पुढील काळात फसेल, असे दिसते. भ्रष्टाचार कमी झाला नाही. त्यामुळे आपण नक्की का केले? हा प्रश्‍न पडतो.
– अजित जोशी

नोटाबंदीनंतर 50 दिवसांत सर्व हिशेब देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, आता 100 दिवसांतही किती काळापैसा आणला? किती नकली नोटा सापडल्या? दहशतवाद्यांकडील पैशाला आळा बसला काय? याचे उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही. ही लोकांची थट्टा नाही काय? केवळ निवडणुका जिंकल्या म्हणजे सारे काही झाले असे नव्हे. लोकशाहीत जनतेला माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, ही जबाबदारी झटकणे योग्य नाही.
– अतुल लोंढे, प्रवक्ते, काँग्रेस.