1 जूनला पुन्हा एकदा शेतकर्‍यांचा एल्गार

0

पुणे । आपल्या विविध मागण्यांसाठी लाँग मार्च काढून सरकारला बॅकफूटवर आणणार्‍या शेतकर्‍यांचा एल्गार पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची अंमलबजावणी व्हावी आणि इतर मागण्यांसाठी येत्या 1 जून रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना घेराव घालण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे. यावेळी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातून दहा कोटी सह्या संकलीत केल्या जाणार आहेत. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातून वीस लाख सह्या गोळा केल्या जाणार आहेत.

1 जून 2018 पर्यंत हे उद्दिष्ट्य पूर्ण केले जाणार आहे. सर्व सरकारी कार्यालयांना घेराव घालतानाच सह्यांची मोहिमही राबविली जाणार असल्याचे किसान सभेने स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली. 1 जून 2017 रोजी शेतकर्‍यांचा अभूतपूर्व संप झाला होता. अहमदनगरच्या पुणतांबे येथून या संपाला सुरुवात झाली होती. या संपाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्या दिवशी शेतकरी आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरतील. तसेच सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याची मागणीही यावेळी केली जाणार आहे. सर्व शेतकरी आणि सामाजिक संघटनांना एकत्र घेऊनच शेतकर्‍यांचे हे आंदोलन छेडले जाणार असल्याचेही नवले यांनी सांगितले.

Copy