७० कामगारांची सुटका

0

धुळे : उसतोडीच्या कामासाठी नेऊन नजरबंदी केलेल्या आदिवासी समुदायातील ७० उसतोड कामगारांची सुटका केंद्रीय रक्षा राज्य मंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने झाली आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आडन तालुक्यातील बाईसर साखर कारखाना येथे उसतोडीच्या कामाला ७० आदिवासी कामगारांनी नेऊन त्यांना बंदी बनविले होते. जिल्ह्यातील साक्री आमोदे, दुसाने व धुळे तालुक्यातील आंचाळे व बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील आदिवासींना एका मुकादमाने नेले होते.

मुकादमाने पैसे घेतल्याचा राग

कर्नाटक येथे उसतोड कामगारांनी चार महिने काम केले. त्यानंतर उसतोड काम बंद झाल्यामुळे आदिवासी मजूर आपल्या गावी परत येण्यासाठी निघाले असता, संबंधित मालक दिलीप जाधव, भीमा जाधव रा. आडन जि.गुलबर्गा कर्नाटक राज्य यांनी आदिवासी कामगारांना सांगितले कि, तुमचा टोली मुकादम शांताराम याने माझ्याकडून १५ लाख रुपये घेऊन गेला आहे. तो आम्हाला पैसे देईल तेव्हाच तुम्हाला कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात पाठविले जाईल. आदिवासी मजूर घरी येण्यासाठी निघाले असता संबधित मुकादमाने त्यांना नजरबंद करून आडन तालुक्यातील भोसरी तांडा येथील मोठ्या धरणाजवळ ठेवले. येथी जाण्यासाठी केवळ एकच रस्ता होता बाकी ठिकाणी पाणी होते मजुरांना पळण्यासाठी देखील रस्ता नवता सदर माजुर गेल्या २० दिवसापासून एका वेळचे जेवण जेमतेम करून राहत होते.

धुलकर यांनी घेतला पुढाकार

शेवटी मजुरांकडील अन्नधान्य देखील संपले. शेवटी उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली तरी देखील कर्नाटकचा मुकादम त्यांना सोडत नव्हता. त्याने त्याचे गावगुंड मारेकरी ठेवले होते ते आदिवासी मजुरांना मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे असे अनेक अडचणींचा सामना करत होते, ही माहिती धुळे तालुक्यातील आंचाळे गावातील गोरख मालचे यांना मिळाली. त्यांचे कुटुंब देखील त्याच ठिकाणी कामाला होते. त्यांनी इतर लोकांकडून फोन घेऊन घरी फोन केला व घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. त्या माहितीवरून अशोक धुलकर यांनी ना. भामरे यांची भेट घेतली व त्यांना संपूर्ण माहिती दिली.

ना. भामरे यांनी दिले पत्र

त्यामुळे ना.डॉ. सुभाष भामरे यांनी कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री व गृह मंत्री तसेच गुलबर्गाचे पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनीवर संपर्क साधला व पत्र दिले. आदिवासी उसतोड कामगार कर्नाटक राज्यातून आणण्यासाठी आदिवासींचे नेते अशोक धुलकर व त्यांचे सहकारी यांच्यासह एकलव्य संघटनेचे पथक कर्नाटक राज्यात जाण्यासाठी धुळे येथून निघाले. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली त्यांना पत्र दिले व संपूर्ण माहिती दिल्यामुळे कर्नाटक पोलीस प्रशासनाने तत्काळ आडन तालुका विभागीय पोलीस अधिकारी यांना आदेश दिले. पोलिसांच्या मदतीने ७० ऊसतोड कामगारांची सुटका केली. सर्व कामगारांनी ना. डॉ. भामरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.