२५ वर्षापासुनचे ओझे आम्ही खांद्यावरून उतरविले; मुख्यमंत्र्यांची भाजपला टोला !

0

नागपूर: शिवसेनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार बनविले. यावरून भाजपकडून वारंवार शिवसेनेवर टीका केली जात आहे. काल विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यानही शिवसेनेवर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले. याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत उत्तर दिले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीराम लागू याच्या एका चित्रपटातील गाण्याचा दाखला देत भाजपला टोला लगावला. सामना या चित्रपटात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गाण्याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी आम्ही युतीत २५ वर्षात आमच्या खांद्यावर असलेले ओझे खाली उतरविले असे सांगत भाजपला डिवचले.

सामन्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याच्या बातम्याचे दाखला भाजपने देत शिवसेनेवर टीका केली होती. यावर देखील आज मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. सामन्यातून आम्ही शरद पवारांवर टीका केली आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुकही केले आहे. ते का नाही भाजपने दाखविले?. केवळ सोयीचे राजकारण भाजपकडून होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येऊन शरद पवार हे माझे राजकीय गुरु असल्याचे सांगतात, त्यांचे बोट धरून मी राजकारणात आलो असे मोदी म्हणतात. मग त्यालाही भाजपचे आमदार विरोध करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवर हे तीन पक्षाचे तीन तीगाडी सरकार असल्याची टीका करत आहे. यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना उत्तर दिले. हे सरकार जनतेचे सरकार आहे, जनतेसाठी काम करणारे असल्याचे हे सरकार कायम टिकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Copy