२०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला मंजुरी

0

धुळे : राज्यातील भाजपा-युती सरकारने धुळ्यातील रखडलेल्या १०० खाटांचे महिला रुग्णालय आणि १०० खाटांचे सर्वोपचार जिल्हा रुग्णालयांचा प्रश्‍न मार्गी लावत या रुग्णालयासाठी आवश्यक पदांना मंजुरी देत ही पदे लवकरच भरली जाणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ना.डॉ. सुभाष रामराव भामरे हे मागील ३५ वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे सदर विषयाची जान त्यांना पूर्ण पणे असल्याकारणाने धुळे जिल्ह्याला २०० खाटांच्या रुग्णालयाची मान्यता मिळविण्यासाठी त्यांनी सातत्याने मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, ना. गिरीष महाजन, ना. विनोद तावडे व ना.डॉ. दीपक सावंत इ. कडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता. त्याची फलश्रुती म्हणून ना. डॉ. सुभाष रामराव भामरे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून यामुळे धुळ्यातील मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत हि २०० खाटांची रुग्णालये सुरु होण्याचा मार्ग यामुळे आता मोकळा झाला आहे.

विशेषोपचार कक्षासाठी पद निर्मिती
राज्यातील ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ७४ नवीन आरोग्य उपकेंद्रे, २० प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ ग्रामीण रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालय, २ जिल्हा रुग्णालय, ४ स्त्री रुग्णालय आणि ६ ट्रॉमा केअर युनिट अशा १११ नवीन आरोग्य संस्थांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल मंत्रालयात याची माहिती दिली. या आरोग्य संस्थांसाठी १३३२ पदे नव्याने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात धुळे आणि नंदुरबार येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे. तसेच धुळे येथील १०० खाटांच्या सर्वोपचार जिल्हा रुग्णालयासाठी व तेथील दहा विशेषोपचार कक्षासाठी पद निर्मिती करण्यात येणार आहे.

राज्य मंत्रीमंडळाकडून मंजूरी
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी या रुग्णांयातील पदे मंजूरीचा सविस्तर प्रस्ताव मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाकडे सादर केला होता. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करीत त्याला राज्य मंत्रीमंडळाकडून मंजूरी मिळवून घेत अनेक दिवसांपासुन प्रलंबित हा प्रश्‍न मार्गी लावला आहे. यात मुख्यतः महिलांच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी २१० पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच चक्करबर्डी येथे हिरे मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाचे स्थलांतरण झाल्याने १०० खाटांच्या सर्वोपचार रुग्णालय कार्यान्वीत करण्यासाठी देखील दोनशे हून अधिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. या पदांची लवकरच भरती प्रक्रिया राज्यपातळीवरुन केली जाणार असून त्यामुळे धुळ्यात जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत नवी आधुनिक आरोग्य सुविधा नागरीकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यावतीने देण्यात आली आहे.

आ.कुणाल पाटील यांनीही केले प्रयत्न
धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जिल्हा शासकिय रुग्णालय चक्करबर्डी येथे स्थलांतरीत झाल्यानंतर जुनी इमारत रिकामी होती. शासकीय रुग्णालय स्थलांतरानंतर शहरवासीयांसमवेत शहरालगत असलेल्या गोरगरीब ग्रामीण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर अनेक प्रश्‍न उभे ठाकले होते. म्हणून या जुन्या इमारतीत २०० खाटांचे रुग्णालय सुरु करावे अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षापासून शासनाकडे लावून धरली होती.याकरीता अनेकवेळा आरोग्यमंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांना प्रत्यक्ष भेटून हे रूग्णालय सुरू होणेसाठीही मागणी केली होती.तसेच विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात आ.कुणाल पाटील यांनी आवाजही उठविला होता. दि.१६ डिसेंबर रोजी आ.कुणाल पाटील यांनी या प्रश्‍नावर नागपुर येथील विधानभवनात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले होते कि,धुळे शहरासह जिल्हयातील आरोग्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. जिल्हा शासकिय रुग्णालय धुळे शहराबाहेर असलेल्या चक्कर बर्डी येथील नव्या इमारतीत स्थलांतरीत झाले आहे. परिणामी शहरातील गोरगरीब रुग्ण व नातेवाईकांची मोठी अडचण निर्माण झाली.शहरापासून नवीन रुग्णालयाचे अंतर लांब असल्याने रुग्णांसाठी खर्चिक व वेळ वाया घालवणारे आहे.