१ मे पासून होणार कपाशीच्या बियाण्यांची विक्री !

0

बियाण्यांचा तुटवडा भासू देणार नाही- ना. गुलाबराव पाटील यांची ग्वाही

जळगाव : – कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर, राज्य शासनाने १ मे पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे. यामुळे उन्हाळी लागवड करणार्‍या कापूस उत्पादकांना लाभ होणार आहे.

शेतकर्‍यांनी केली होती मागणी

याबाबत वृत्त असे की, यंदा १४ फेबु्रवारी रोजी झालेल्या कापूस उत्पादकांच्या बैठकीत २५ मे २०२० पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या आपत्तीमुळे सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने यंदा बियाणे पाकिटांची विक्री ही आधीपासून करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर व कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हा प्रश्‍न सोडविण्याचे साकडे घातले. ना. पाटील यांनी याबाबत कृषी मंत्र्यांशी चर्चा करून १ मे पासून कापूस बियाणे विक्री करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने ही मागणी मान्य करण्यात आली असून यंदा १ मे पासून शेतकर्‍यांसाठी कपाशीचे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

शेतकर्‍यांची फसवणूक टळणार

जळगाव जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र खूप मोठे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ५,०७,५८३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. गत वर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यंदा उन्हाळी लागवड होणार असून एकंदरीत कपाशीच्या लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे ५,१०,७५५ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होऊ शकतो. यातील ५,०५,३६४ हे बीटीचे तर ७६९१ हेक्टर हे नॉन-बीटीचे क्षेत्र राहील असा अंदाज आहे. यासाठी २५,५३७७५ बियाण्यांचे पाकिटे लागणार असून यात यात २५,१५,३१९ इतके बीटी-२ तर ३८४५६ नॉन-बीटी बियाण्यांची पाकिटे असतील असा अंदाज आहे. नेहमी प्रमाणे मे अखेरीस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध केल्यास शेतकरी आधीप्रमाणेच अन्य जिल्ह्यांमधून बियाणे खरेदी करतील व यात त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण आधी अनेकदा हे प्रकार घडलेले आहेत. शेतकर्‍यांची ही फसवणूक टाळण्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी प्रयत्न केल्यामुळे आता शेतकर्‍यांना १ मे पासूनच बियाणे उपलब्ध होणार आहे. राज्याच्या कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व कृषी सहसंचालकांना पत्राद्वारे याची माहिती दिली आहे.

काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई- ना. पाटील

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांना यंदा १ मे पासून कपाशीची बियाणे उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना बियाण्यांचा तुटवडा होऊ देणार नसल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली आहे. तर बियाण्यांचा काळाबाजार करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Copy