Private Advt

१८ वर्षांखालील मुलांचे लवकरच लसीकरण : केंद्र सरकार

नवी दिल्ली : देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगात सुरू आहेच. मात्र आता १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरणही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या देशात १८ वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत आणि त्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
केंद्र सरकारने आज दिल्ली उच्च न्यायालयाला याबद्दलची माहिती दिली.

१८ वर्षांखालील मुलांवर सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, त्या लवकरच पूर्ण होतील. त्या पूर्ण झाल्या आणि तज्ज्ञांनी लसीकरणाची मान्यता दिली की लगेचच १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठीचं नियोजन करण्यात येईल आणि या लसीकरण मोहिमेलाही लगेचच सुरुवात करण्यात येईल असे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले. १२ ते १८ वयोगटातल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी अशी याचिका एका १२ वर्षीय बालकाने आपल्या आईच्या माध्यमातून आणि एका ८ वर्षांच्या मुलाच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.