Private Advt

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

३१ मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव-: कृषिपंपांच्या वर्षानुवर्ष थकीत वीजबिलांच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सवलतीचा लाभ घेत ३ लाख ७५ हजार २५४ शेतकऱ्यांसह राज्यातील तब्बल १२८० गावांनी कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले आहे. तर राज्यभरातील ३० हजार ३९९ रोहित्रांवरून वीजजोडणी असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी संपूर्ण थकबाकीचा भरणा करून रोहित्रांना देखील थकबाकीमुक्त केले आहे. राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची
महावितरणकडून सुरु असलेल्या अंमलबजावणीला मोठे यश मिळत असून येत्या ३१ मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे.

वीजबिलांची थकबाकीमुक्ती, कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या, भरलेल्या कृषी बिलांमधील ६६ टक्के रक्कम स्थानिक वीजयंत्रणेसाठी खर्च करण्याची तरतूद असलेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील या धोरणाला तर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वातील अंमलबजावणीला
शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी ३ लाख ७५ हजार शेतकऱ्यांसह १२८० गावांनी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचे स्वप्न साकारले आहे. तर आतापर्यंत १९ लाख ५८ हजार ७३४ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग घेतला असून २०६३ कोटी ४३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या शेतकऱ्यांची एकूण ६१०० कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यात आली आहे.

कोकण प्रादेशिक विभागातील सर्वाधिक ११२२, पुणे- ९३, नागपूर- ६१ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ४ अशा एकूण १२८० गावांमधील शेतकऱ्यांनी चालू वीज बिल व ५० टक्के सुधारित थकबाकीचा भरणा करून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. याचप्रकारे राज्यभरातील ३०,३९९ वितरण रोहित्रे कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झाले आहेत. या रोहित्रांवरून वीजजोडणी घेतलेल्या ४३ हजार ७७५ शेतकऱ्यांनी ३८ कोटी २९ लाख रुपयांचा भरणा करून कृषिपंपांचे वीजबिल कोरे केले आहे. यात कोकण- १० हजार ४४, पुणे- ८ हजार २३०, नागपूर- ८ हजार ३९३ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील ३ हजार ७३२ रोहित्रांचा समावेश आहे.