११ मार्चला पाच राज्यांचे निकाल

0

मुंबई । पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांचे एक्झिट पोल गुरुवारी जाहिर झाले. आज पाच राज्यांचे निकाल जाहिर होत आहेत. मतपेटीतून खुलणार्‍या भाग्यामध्ये कोणाची दिवाळी? आणि कोणाची होळी? साजरी होणार याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.विविध एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये भाजपची सत्ता येणार असे चित्र आहे. तर पंजाबमध्ये मात्र सत्तेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये शर्यत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र इतर चार राज्यांपेक्षा उत्तर प्रदेशमधील एक्झिट पोलबाबत भाजपविरोधी पक्षांनी शंका घेतली आहे. बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे एक्झिटपोलचा अंदाज खोटा ठरला त्याची पुनर्रावृत्ती उत्तर प्रदेशमध्ये होऊन भाजपतेर सरकार राज्यात सत्तेवर येईल असा दावा काही राजकिय नेत्यांनी वर्तवला आहे.

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत 403 जागा असून सत्ता स्थापनेसाठी 202 ही मॅजिक फिगर आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला यावेळी सर्वाधिक 185 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीला 124, मायावतींच्या बसपाला 84 जागा आणि इतर आठ असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्यामुळे सत्तेत जाण्यासाठी सर्वच पक्षांना बाहेरुन मदत घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत भाजपविरोधी पक्ष एकत्र येउन सत्ता स्थापन करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. राज बब्बर म्हणाले की, केंद्रात कॉग्रेससह समाजवादी पार्टी आणि बसपाने एकत्र काम केलेले आहे. त्यामळे राज्यातही हा पर्याय वापरला जाऊ शकतो. काही जणांनी तर बिहार पॅटर्नप्रमाणे उत्तर प्रदेशात महाआघाडी तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रचारा दरम्यान मायावतींवर आगपाखड करणार्‍या अखिलेश यादव यांनी मतदानानंतर लगेचच बुवाजी को चाय का न्योता दिया है। असे सांगून पुढील वाटचाल कशी असेल याचे संकेत दिले होते. एक्झिट पोलचा अंदाज बाहेर आल्यावर राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी होळी आधीच दिवाळी साजरी करताना फटाके फोडायला सुरूवात केली. भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असा अंदाज असला तरी सत्तासोपान त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनंतर भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजप काय चाल खेळेल हे नंतर कळेल.

उत्तराखंडमध्येही भाजपला सर्वात जास्त मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला. मात्र येथेही राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री हरिश रावत यांनी इतर राज्याचे माहित नाही, पण उत्तराखंडमध्ये मात्र काँग्रेस सत्ता राखेल असा विश्‍वास व्यक्त केला. एक्झिटपोलमध्ये पंजाब वगळता इतर राज्यांमध्ये भाजप सगळ्यांच्या पुढे असेल असा अंदाज आहे. पण मॅजिक फिगर गाठण्यासाठी सगळ्याच पक्षांना इतरांची मदत घ्यावी लागेल हे नक्की.