फ़िदायीन म्हणजे काय?

0

आठ वर्षे होऊन गेली कसाब टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्याला! काश्मिरातही आज अनेक घातपाती हल्ले सातत्याने होतच असतात. त्यातले अनेक हल्ले फ़िदायीन हल्ले म्हणून ओळखले जातात. फ़िदायीन हा जिहादी लढवय्या असतो. तो धर्मासाठी आत्मसमर्पण करायला कटीबद्ध झालेला असतो. अशा हल्ल्यातून त्याला काहीही मिळणार नसते. पण कदाचित पकडला गेल्यास शिक्षा होणार असते. म्हणूनच शक्यतो, त्याला जीवंतपणी पोलिसांच्या हाती लागायचे नसते. मग त्यातून त्याला काय साध्य करायचे असते? कुणी कडवा मुस्लिम, धर्माचा आधार घेऊन स्वर्ग किंवा जन्नत असे उत्तर देईल. पण त्याला आजच्या व्यवहारी जगात काडीमात्र अर्थ नसतो. मेल्यावर कुठला स्वर्ग आणि कुठला नरक? त्यामुळेच फ़िदायीन म्हणजे मरायला सिद्ध झालेला घातपाती, अशीच व्याख्या असते. पण ही झाली त्या एका आत्मघातकी फ़िदायीनची बाजू! त्याच्याखेरीज अशा घातपातामध्ये मरणार्‍यांचीही बाजू असतेच ना? त्यांना कुठे स्वर्ग हवा असतो? त्यांना तर साधेसरळ जगायचे असते. आज जे जग आहे, त्यात मिळेल त्या सुविधांनिशी जगण्याची इच्छा असलेले लोक फ़िदायीन हल्ल्यात हकनाक मारले जात असतात. म्हणूनच अशा फ़िदायीनची दहशत असते. त्याच्या हल्ल्यापासून आपले जग वाचवण्याची कसरत जगातल्या सगळ्या सरकारांना करावी लागत असते. त्या सरकारचे पोलिस वा शस्त्रास्त्रे यांच्यापुढे फ़िदायीन दुबळा असतो. त्याच्यापाशी कुठलेही प्रभावी हत्यार नसते. त्याचे खरे हत्यार विध्वंसात असते. विध्वंसाला प्रेरीत झालेला माणूस, काही मिळावे म्हणून लढत नसतो. आपल्या सोबत इतरांचे होईल तितके अधिक नुकसान करण्याने पेटलेला असतो. म्हणूनच फ़िदायीन लढवय्याचे पारडे जड असते. ज्यांना याचे भान राखता येते, ते शक्यतो लोक अशा विध्वंसक भूमिकेत जाऊ नयेत याची काळजी घेत असतात. राजकारणातही असे फ़िदायीन असू शकतात.

लढाईमध्ये कोणाला काय मिळवायचे आहे, त्यानुसार निकाल अवलंबून असतात. तेच राजकारणातही असते. तामिळनाडूच्या राजकारणात पन्नीरसेल्व्हम यांनी अखेरीस काय मिळवले? त्यांच्यापाशी असलेले मुख्यमंत्रीपद गेले आहे आणि शशिकला मुख्यमंत्री होण्यात त्यांनी अडथळा केला नसता, तर आजही सेल्व्हम यांना कुठलेतरी एक महत्वाचे मंत्रीपद नक्कीच मिळाले असते. कदाचित शशिकलांना तुरूंगात जावे लागल्यावर खुद्द पन्नीरसेल्व्हमच विश्वासू सहकारी म्हणून पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसले असते. पण तसे झालेले नाही. सेल्व्हम यांना सर्वकाही गमावण्याची पाळी आली आहे. असे तामिळनाडूची स्थिती बघितल्यावर आपण म्हणू शकतो. पण ही आजची स्थिती आहे आणि उद्याच्या पोटात काय दडलेले आहे, ते आपल्यालाही ठाऊक नाही. कारण शशिकला यांच्या इच्छेने निवड झालेल्या व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली आहे आणि शनिवारी त्याच्यावरच विधानसभेत बहूमतही सिद्ध होऊन जाईल. म्हणजेच सेल्व्हम यांचे राजकारण संपले, असे मानण्याचे कारण नाही. त्यांच्या वाट्याला आज काय आले ते बघण्याचीही गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे शशिकला यांनी ठरवले त्यानुसार सर्वकाही झाले असते, तर त्या माजी मुख्यमंत्री म्हणूनच तुरूंगात गेल्या असत्या. पण ती संधी आता हुकलेली आहे. कारण पुढली दहा वर्षे त्या निवडणूक लढवू शकत नसल्याने, कुठलेही घटनात्मक पद घेऊ शकत नाहीत. भले त्यांची कठपुतळी म्हणून पलानीसामी कारभार करतील. पण किती दिवस ते चालेल याची आज हमी नाही. शपथविधी उरकून गेला तरीही शशिकलाच्या गोटातल्या आमदारांना कोंडुनच ठेवावे लागले आहे. याचा अर्थ ज्यांच्यावर विसंबून पलानीसामी मुख्यमंत्री झाले आहेत, त्याच आमदारांवर सामी यांचाच विश्वास नसल्याची ग्वाही मिळू शकते. सहाजिकच शशिकला तुरूंगातून सामींवर किती विश्वास ठेवतील?

सेल्व्हम यांना हेच तर साधायचे होते. शशिकला तुरुंगात गेल्यावर त्यांची पक्षावर फ़ारकाळ हुकूमत राहू शकत नाही, हे सेल्व्हम जाणून होते. एकदा विधानसभेतील विश्वास ठराव संपला, मग आमदार मोकळे सोडावेच लागणार आहेत. पण आता ह्या सर्व आमदारांना आपली खरी किंमत व बळ उमजलेले आहे. त्यापैकी दहाबारा आमदारांनी जरी बाजूला व्हायचे ठरवले, तरी शशिकला यांचे बाहुले सरकार अडचणीत येऊ शकते. त्या सरकरमध्ये आपल्याला महत्वाचे अधिकारपद मिळावे म्हणून प्रत्येक आमदार आपले हिस्से मागू शकतो वा फ़ुटण्याच्या धमक्या देऊ शकतो. सेल्व्हम यांनी त्या आमदारांना त्यांची महत्ता लक्षात आणून दिली आहे आणि पर्यायाने अण्णाद्रमुक पक्षातील शशिकला यांची एकमुखी हुकूमत डळमळीत करून टाकली आहे. सहाजिकच काही दिवस सरकार चालणार असले, तरी त्याच्या डोक्यावर आमदार फ़ुटण्याची तलवार कायमची टांगली गेली आहे. अशा स्थितीत त्यांना मुठीत ठेवण्याची कुवत शशिकला यांच्यापाशी असली, तरी अन्य कुणा नेत्यापाशी नक्कीच नाही. त्या तुलनेत सेल्व्हम हिंमतीचा नेता आहे आणि त्याने फ़िदायीन होऊन अण्णाद्रमुक पक्षातील कडव्या हुकूमतीचा विध्वंस करून टाकला आहे. शशिकलांना आव्हान देऊ शकणारा नेता म्हणून तो उदयास आलेला आहे. शिवाय पुर्वी तीनदा मुख्यमंत्री झालेला असल्याने जयललितांचा विश्वासू सहकारी अशी त्याची ख्याती झाली आहेच. त्यामुळेच त्याने बचावात्मक पवित्र्यातल्या शशिकला यांच्या गोटाला भयभीत करून टाकले आहे. बहूसंख्य आमदार त्याच गोटात असले तरी कोण कधी उठून सेल्व्हमच्या गोटात दाखल होईल, अशी आशंका त्याने शशिकलासह अन्य नेत्यांमध्ये निर्माण करून ठेवली आहे. एकगठ्ठा आमदार ही संकल्पना त्याने उध्वस्त करून टाकली आहे. शशिकला गटाला कायम फ़ुटण्याच्या भयात ढकलून दिले आहे.

पन्नीरसेल्व्हम यांच्यावर अशी फ़िदायीन व्हायची पाळी शशिकला यांनी आणली, हे विसरता कामा नये. शशिकला या अम्मा नाहीत आणि त्यांचा शब्द व चेहरा यामुळे अण्णाद्रमुक निवडणूका जिंकू शकत नाही. म्हणूनच आमदार आज तिथेच असले तरी लौकरच होणार्‍या स्थानिक संस्थांच्या निवडणूकात पलानीसामी यांना यश मिळवता आले नाही, तर त्यांचा गट व सत्ता धोक्यात आहे. कारण सेल्व्हम आपल्या गटाकडून उमेदवार उभे करणार. भले द्रमुक जिकली तरी चालेल, पण शशिकला गटालाला संपवायचे, असा चंग बांधूनच सेल्व्हम त्या निवडणूकीत उतरणार हे विसरता कामा नये. आमदारांना जमवून वा सक्तीने सोबत ठेवून सतत हस्तगत करता येते. पण टिकवता येत नसते. म्हणूनच शशिकला यांनी मुख्यमंत्री पदाचा हव्यास न करता सेल्व्हम यांनाच त्या पदावर राहू दिले असते, तर आज तोच माणूस बंगलोरच्या तुरूंगात चिन्नम्माला भेटायला गेला असता. डोळ्यात अश्रू आणून त्याने आपल्या निष्ठा वाहिल्या असत्या. पण चिन्नम्माने त्याला फ़िदायीन होण्याच्या कडेलोटावर आणुन उभे केले आणि पुढल्या घडामोडी आपल्या समोर आहेत. सेल्व्हम यांच्यासारख्या मवाळ नेत्याला शशिकलांचा हव्यास फ़िदायीन बनवून गेला. सर्वच आपल्या हाती केंद्रीत करण्याचा हव्यास आपल्याच निकटवर्तियांना मित्रानाही फ़िदायीन बनवत असतो. जेव्हा ठराविक व्यवस्थेमध्ये आपल्या हिताचे वा मतलबाचे काही उरले नाही अशी धारणा होते; तेव्हा माणूस विध्वंसाला प्रवृत्त होत असतो. आपल्याला काय मिळणार यापेक्षा प्रतिस्पर्ध्याचा अधिक विध्वंस हे़च त्याच्यासाठी ध्येय होऊन जाते. तेच सेल्व्हम यांचे झाले आणि महाराष्ट्रात पंचवीस वर्षे जुना मित्र असलेली शिवसेना भाजपाच्या मूळावर येण्यासाठी त्यामुळेच फ़िदाय़ीन झाल्याप्रमाणे वागताना दिसते आहे. पलानीसामी सरकार व फ़डणवीस सरकार, एकाच राज्यपालाच्या अखत्यारीत येतात, हा निव्वळ योगायोग आहे.