फ़डणविसांच्या रुपाने महाराष्ट्राला देवेंद्र ‘मोदी’ गवसला

0

मुंबई : राज्यातील बहुतेक भागात भाजपाला यश मिळवून देण्यासाठी गेला महिनाभर मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस त्यांनी अखंड धावपळ केली होती. म्हणूनच राज्यातील त्या पक्षाच्या यशाचे श्रेय त्यांनाच मिळणार आहे. किंबहूना त्यांच्या रुपाने महाराष्ट्रातला ‘मोदी’ भाजपाला गवसला म्हणायला हरकत नाही. विधानसभा निवडणूकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद फ़डणवीस यांच्याकडे होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यभर आपली छाप पाडली आहे. मध्यंतरी त्यांची पेशवा म्हणून शरद पवारांनी खिल्ली उडवली होती. पण मुंख्यमंत्र्यांनी आपल्या अंतरीच्या ‘नाना’ कळा दाखवून फ़डणविशीच सिद्ध केली आहे. गुजरातमध्ये जसा मोदींनी आपला प्रभाव निर्माण केला, तशीच वाटचाल देवेंद्र करीत असल्याचे दिसते आहे.

आता राज्यातील सत्तेत शिवसेनेला नमते घ्यावे लागणार आहे. कारण मुंबईतही भाजपाने आपले बळ पुन्हा सिद्ध केले आहे आणि त्यामुळेच शिवसेनेच्या धमक्यांना भिक घालण्याची भाजपाला गरज राहिलेली नाही. किंबहूना सरकार नोटिसवर असल्याचा गमजा हवेत विरून गेल्या आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या नेत्यांनी सरकार पडल्यास मध्यावधी निवडणूक होण्याचे आडाखे बोलून दाखवले होते. पण आता तशी शक्यता उरलेली नाही. उलट भाजपा वगळता अन्य पक्षांनीच आपली पुरेशी डागडूजी करण्याची गरज समोर आलेली आहे.

एकाच फ़टक्यात मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रीमंडळातील विरोधक शिवसेना व पारंपारिक विरोधक राष्ट्रवादी व कॉग्रेस यांना पाणी पाजले आहे. यातून त्यांनी पक्षातले विरोधकही निकामी करून टाकले आहेत. आता देवेंद्र यांना महाराष्ट्रात कोणीही पर्याय राहिलेला नाही. त्यांनी आपले राज्यव्यापी नेतृत्व निर्विवाद सिद्ध केलेले आहे. त्यामुळेच त्यांना पुर्ण पाच वर्षे निश्चींत मनाने सत्ता राबवता येणार आहे.