Private Advt

होमगार्डने लांबवली चुंचाळ्यातून बैलजोडी : तीन आरोपींना अटक

यावल : तालुक्यातील चुंचाळे गावातील पशूधन चोरीप्रकरणी होमगार्ड असलेल्या जवानासह तिघांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेज मधून या गुन्ह्याचा उलगडा झाला. याप्रकरणी यावल न्यायालयाने तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सीसीटीव्हीमुळे चोरी उघडकीस
चुंचाळे येथील शेतकरी अशोक साहेबराव धनगर यांची 20 हजार रूपये किंमतीची बैलजोडी 2 ऑगस्टला रात्री चोरी झाली. याबाबत यावल पोलिसांत गुन्हा दाखल होता. तपासात यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी गावातील घटनास्थळासह चुंचाळे गावातून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्गापर्यंत येणारे रस्ते यात बोराळे आणि किनगावकडील मार्गावर पाहणी केली. त्यात किनगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या फुटेजमध्ये चुंचाळे येथील रहिवासी तथा होमगार्ड दिनेश उर्फ दीपक बाळू पाटील हा बैलजोडी असलेल्या एका वाहनाच्या पुढे दुचाकी घेऊन जाताना दिसला. तेव्हापासून पोलिस दिनेश पाटीलच्या मागावर होते. तो मंगळवारी रात्री किनगावात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला व दोन साथीदार अनुक्रमे ऋषिकेश राजेंद्र पाटील (23, रा.राजोरा ता.यावल) आणि अरूण गोकुळ पाटील (35, रा.चांदणी कुर्‍हा ता.अमळनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. बुधवारी या तिघांना यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधीश एम.एस.बनचरे यांनी पाच दिवसांची (23 ऑगस्टपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करत आहे. तिन्ही संशयितांसह गुन्ह्यात वापरलेली पिकअप व्हॅन (क्रमांक एमएच.05-एचडी.4536), विना क्रमांकाची दुचाकी व बैलजोडी असा एकुण 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.