हॉर्न का वाजविला चालकाला मारहाण

0
पिंपरी : हॉर्न वाजवला एवढ्या क्षुल्लक कारणावरून चालकाला दगडाने मारहाण केल्याची घटना तीन ऑक्टोबरच्या रात्री पिंपरीतील ताथवडे येथे घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गजानन वीरकर असे जखमी चालकाचे नाव आहे. चारचाकीतून निघालेल्या गजानन यांनी हॉर्न वाजवला. त्यानंतर दुचाकीस्वारांनी दमबाजी करत तू हॉर्न का वाजवतोस? असा प्रश्‍न विचारला. वाद नको म्हणून मोटार घेऊन गजानन वीरकर पुढे गेले. त्यानंतर दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला आणि कार अडवून दगडाने आणि हाताने मारहाण केली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. या दोघांनीही गजानन वीरकर यांच्या कारच्या काचाही फोडल्या, दार चेपवले. वाक पोलिसांनी या प्रकरणी दुचाकीस्वारांना अटक केली आहे. चार दिवसांपूर्वीच मोबाइल लुटण्यासाठी पादचार्‍यांना कोयत्याचा धाक दाखवण्याची घटना घडली होती. आता हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून चालकाला मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्‍न विचारला जातो आहे.