हॉकर्स बांधवांनी फिरविली मनपाच्या ‘लकी ड्रॉ’कडे पाठ

0

जळगाव । शहरातील अतिक्रमणधारकांना ख्वॉजामिया झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्याचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावानुसार महापालिका प्रशासनाने शुक्रवार 12 मे रोजी स्थलांतर प्रक्रीया उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी सोडत काढून राबविली. यानुसार महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सोडत काढण्यात आली. मात्र, सोडतीकडे हॉकर्स बांधवांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.

हॉकर्सच्या अनुपस्थितीत जागा वाटप पूर्ण
या स्थलांतर करण्यात येणार्‍यांमध्ये बळिराम पेठेतील 383, सुभाष चौक 309 आणि शिवाजी रोड 90 असे एकूण 782 हॉकर्संना स्थलांतरित करण्यात येणार आहे. यामध्ये 444 भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते, 102 फूल विके्रते व 196 अन्य किरकोळ विक्रेते यांचा समावेश आहे. सोडत काढण्यासाठी उपायुक्त कहार, अतिक्रमण अधिक्षक खान हे दुपारी 2 वाजेपासून सभागृहात स्थलांतर सोडतीसाठी उपस्थित होते. अतिरिक्त विकल्प म्हणून या विक्रेत्यांना लकी ड्रॉद्वारे जागा वाटप करण्यात आली. लकी ड्रॉ काढतांना 782 हॉकर्स पैंकी केवळ 70 ते 80 हॉकर्स बांधव उपस्थित होते. दरम्यान, हॉकर्स बांधवांनी आहे तेथे व्यवसाय करू देण्याची मागणी पुन्हा केली आहे. तर मनपा प्रशासनाने जे हॉकर्स बांधव स्थलांतर करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. या लकी ड्रॉ प्रसंगी विजय मराठे, आतिष राणा, सुनील पवार, संजय परदेशी, साजीद अली आदी उपस्थित होते.