हे शिंतोडे कशासाठी?

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी बरे बोलतात. अलीकडे त्यांच्या बोलण्यात थोडी प्रगल्भताही येत आहे. परंतु, डोक्यात सूडबुद्धी ठेवण्याची त्यांची सवय काही जात नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी मोजक्याच शब्दांत मोदींच्या निर्णयावर टीका केली होती. त्या टीकेच्या सूडातून मोदींनी राज्यसभेत डॉ. सिंग यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे भाषण केले. बाथरूममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला डॉ. सिंग यांना अवगत असल्याचे ते म्हणालेत. स्वतः अंगभर नानाविध डाग मिरवायचे आणि आपले अंग घाणेरडे आहे म्हणून दुसर्‍याच्या स्वच्छ चारित्र्यावर शिंतोडे उडवत फिरायचे, हे काही पंतप्रधानपदावरील व्यक्तीला शोभणारे नाही. अखेर हे शिंतोडे उडवले तरी कशासाठी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या राज्यसभेतील भाषणावरून बराच काथ्याकूट सुरू आहे. जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर त्यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्याबद्दल प्रत्येकालाच खटकले खरे. परंतु, त्या हल्ल्याव्यतिरिक्त मोदी जे काही बोललेत ते दुर्लक्षून कसे चालेल? डॉ. सिंग यांच्यावर बोलताना मोदींनी मुद्दामहून उपहासाचा आधार घेतला. त्याला कारण, डॉ. सिंग यांनी नोटाबंदीनंतर मोदींवर केलेली टीका त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्याला उत्तर देण्याची संधी ते शोधतच होते, ती त्यांनी बुधवारी सत्कारणी लावली. मुळात नरेंद्र मोदी आणि डॉ. मनमोहन सिंग या दोन नेत्यांची तुलना होऊच शकत नाही. डॉ. सिंग यांची विद्वत्ता, त्यांची देशसेवा आणि देशाच्या आर्थिक जडणघडणीतील योगदान याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. त्या उलट मोदी यांचे या देशाच्या विकासात काहीही योगदान नाही, त्यांचे व्यक्तिमत्त्वच इतके वादग्रस्त आहे, की मोदी म्हटले की लोकांना गुजरातचा नृशंस नरसंहारच आठवतो. नोटाबंदीचा निर्णय योग्य होता की अयोग्य? या प्रश्‍नाचे उत्तर काळच देईल. तूर्त तरी या निर्णयाचे दूरगामी परिणाम समाज जीवनावर झाले असून, समाजातील अनेक घटक अडचणीत सापडले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय योग्य आहे, असे मोदी म्हणत असतील, तर तसे परिणाम अद्याप तरी दिसून आलेले नाहीत, ते कधी दिसतील याबाबत साशंकता आहे. डॉ. सिंग हे गेली साडेतीन दशके देशाच्या अर्थव्यवस्थेची धोरणे आखणे आणि राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. देशाच्या अर्थकारणावर इतकी वर्षे प्रभाव असलेले ते एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. आर्थिक सत्ता ताब्यात असतानाही या व्यक्तीने कधी पाच पैशाचाही गैरव्यवहार केल्याचे कुठे निदर्शनास आले नाही. किंबहुना अत्यंत साधे जीवनमान ते जगत आहेत. त्यांच्या घरात पुस्तके, पुरस्कार, पदव्या आणि सन्मानचिन्हे सोडली तर काहीही आढळणार नाही. खरे तर असे व्यक्तिमत्त्व हे देशाचे भूषण असून, या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाबद्दल मोदींसारख्या व्यक्तीने काहीही बरळणे चुकीचे आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची अशी बडबड प्रत्येकाच्याच मनाला खटकली आहे.

देशात झालेल्या मोठमोठ्या घोटाळ्यांत काँग्रेसचा जसा हात आहे, तसा तो भाजपचाही आहे. दीर्घकाळ काँग्रेस सत्तेवर राहिल्याने हा पक्ष जरा जास्तच बदनाम झाला. तितकी बदनामी भाजपच्या वाटेला आली नाही. म्हणून या घोटाळ्यांना डॉ. सिंग हेच जबाबदार आहेत. परंतु, ते चाणाक्षपणे त्यातून सुटले असे मोदींना त्यांच्या भाषणातून सुचवायचे होते का? ‘बाथरूममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला’ म्हणजे नेमके काय मोदींना म्हणायचे? नोटीबंदीनंतरच्या संसदेतील भाषणात अगदी मोजक्याच शब्दांत मोदींवर डॉ. मनमोहन सिंग यांनी टीका केली होती. किंबहुना ती टीका नव्हतीच तर देशाविषयी आणि एकूणच अर्थव्यवस्थेविषयी व्यक्त केलेली काळजी होती. त्यांनी आर्थिक विकासदर घसरेल, असे सूचित केले होते. आता तसेच होत आहे की नाही? ‘निर्णयाची लूट,’ ‘अपयशाचे स्मारक’ अशी संभावना करणारे डॉ. सिंग खरे तर त्यावेळी देशातील विचारशील लोकांच्या भावना बोलून गेले होते. परंतु, तो राग मनात ठेवून मोदी काल जे बोलले ते सूडबुद्धीने बोललेत आणि असली सूडबुद्धी देशाचा कारभार चालवणार्‍या व्यक्तीला शोभणारी नाही. नोटाबंदीनंतर सरकारने कुणाची लूट केली नाही, राज्यघटनेचे उल्लंघन झालेले नाही, असे मोदी म्हणाले होते. तसे असेल तर जे उद्ध्वस्त झालेत ते श्रीमंत होते की गरीब? रांगेत बळी गेलेले श्रीमंत होते की गरीब? या प्रश्‍नाची उत्तरेही त्यांनी आता द्यायला हवीत.

गेल्या काही महिन्यांपासून मोदींचे एक तुणतुणे ऐकायला मिळते. नोटाबंदीचा निर्णय घेण्यासाठी तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी आग्रह धरला होता. परंतु, निवडणुकीची काळजी करून स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला नकार दिला होता. या निर्णयाचा हवाला देण्यासाठी ते माधव गोडबोले यांच्या एका पुस्तकातील घटनेचा आधार घेतात. एखाद्या पुस्तकात नमूद केलेली घटना, त्या घटनेमागचे कारण आणि मीमांसा याचे तथ्य न तपासता मोदी या अनुषंगाने विधाने करत आहेत. किंबहुना नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी गोडबोले यांचे पुस्तक त्यांना मोठा आधार झाला आहे. कुणी काहीही लिहिल त्याकडे दुर्लक्ष करा, या काँग्रेसच्या उदात्त भूमिकेतून त्यावेळी या पुस्तकाकडे दुर्लक्ष केले गेले. काळापैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असे मोदी सांगत आहेत. या त्यांच्या म्हणण्यातील तथ्यांश त्यांनी खरे तर संसदेत पटवून द्यायला हवा, आपला निर्णय कसा अचूक ठरला आणि योग्यच होता हे त्यांनी सोदाहरण पटवून द्यायला हवे. स्वतःवर भले मोठे डाग आहेत, म्हणून दुसर्‍याच्या स्वच्छ चारित्र्यावर शिंतोडे उडवणे व त्यालाही आपल्यासारखेच समजणे ही चुकीची मानसिकता आहे. मोदींना पंतप्रधान झाले तरी एवढे कसे कळत नाही?