…हे महाभारत घडणारच होते!

0

तामीळनाडूत अपेक्षेप्रमाणेच सत्तेसाठी सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. तामीळनाडूतील सत्तारूढ अण्णाद्रमुकचा ताबा शशिकलांकडे राहणार की ओ. पनीरसेल्वम सर्वेसर्वा बनणार, हे काही काळात स्पष्ट होईल. मात्र, सध्या शशिकला यांना चहूबाजूंनी घेरण्याची जी खेळी खेळली जात आहे, ती पाहता शशिकला यांचे भवितव्य अंधकारमयच असणार हेही स्पष्ट होत आहे.

तामीळनाडूत सत्तारूढ अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णा द्रमुक) पक्षात अपेक्षेप्रमाणेच सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. सत्तेसाठीची ही साटमारी टाळताही येणारी नव्हती. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता जीवलग मैत्रीण शशिकला नटराजन यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जयललिता हयात असतानाच लपून राहिलेली नव्हती. याच महत्त्वाकांक्षेमुळे अम्मांनी शशिकलांना 2012 मध्ये पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला होता. शशिकलांनी पुढे नमते घेतल्याने त्या पुन्हा पक्षात परतल्या होत्या. ओ. पनीरसेल्वम (तामीळनाडूत ते ओपी या नावानेच प्रसिद्ध आहेत) यांची गोष्ट अगदी वेगळी होती. अम्मांचे एकनिष्ठ सेवक म्हणूनच ते सर्वांना ज्ञात आहेत. अम्मांना दोन वेळा मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. त्या वेळी अम्मांनी ओपींनाच मुख्यमंत्रीपदावर बसवले होते. अम्मांच्या पश्‍चात ओपींकडेच मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आली आणि ते स्वाभाविकही होते. अम्मांचे विश्‍वासू हीच पक्षातील दुसरी फळी. या फळीचा शशिकला यांना विरोध असल्याचे अम्मांच्या अखेरच्या आजारपणातच स्पष्ट झाले होते. असे असतानाही त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली, हेच आधी आक्रीत होते.

या महाभारतातील सगळ्याच घटना या तांत्रिक मुद्द्यांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही लढाई किचकट स्वरूपाची आहे. जी व्यक्ती सलग पाच वर्षे पक्षसंघटनेत कार्यरत आहे, तिलाच पक्षाचे पद भूषवता येईल, असे अण्णा द्रमुकच्या घटनेत असे नमूद आहे. शशिकला यांना 2012 मध्ये पक्षातून हाकलून देण्यात आले होते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्या पक्षाच्या सरचिटणीसच बनू शकत नाहीत. अम्मांच्या अपरोक्ष मुख्यमंत्री बनले आणि पद सोडले म्हणून पनीरसेल्वम माजी मुख्यमंत्री ठरतात. आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, राज्यपालांनी तो मंजूरही केला असल्याने ते सध्या हंगामी मुख्यमंत्री आहेत. तसेच राजीनामा मागे घेण्याची परवानगी दिल्यास मी पुन्हा पक्षाची आणि पदाची सूत्रे हाती घेईन, असे ते म्हणतात. म्हणून भावीही मुख्यमंत्री तेच आहेत. माजी, हंगामी आणि भावी असे मुख्यमंत्री असणारे ते देशातले आणि जगातलेही कदाचित पहिलेच नेते असतील.

जयललिता यांच्याप्रमाणेच शशिकला यांच्यावरही किमान पन्नास खटले दाखल आहेत. त्यातील अवैध मालमत्ताबाबतच्या खटल्याची सुनावणी आजही सुरू आहे आणि जयललिता प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला किंवा फिरवल्यास शशिकलांची तुरुंगवारी नक्की आहे. हाच मुद्दा पकडून सेथिलकुमार नामे एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत शशिकलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीस स्थगितची मागणी केली आहे. त्यांच्या अर्जावर येत्या आठ दिवसांत सुनावणी होणार आहे. याशिवाय आधीच्या खटल्यांची सुनावणीही आता सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.

शशिकलांनी सांगितल्यानंतर गेल्या रविवारी ओपींनी मुख्यमंत्रीपद सोडले. त्यांनी त्यावेळी कोणताच आक्षेप घेतला नाही. मात्र, तीन दिवसांनीच त्यांनी बंडाचे निशाण का फडकावले, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर दिल्लीतील घडामोडींत दडलेले आहे. इकडे ओपींचे राजीनामा देण्याचे ठरत असतानाच तिकडे दिल्लीत शशिकलांचे पतीराज एम. नटराजन कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आदी काँग्रेसमधील ज्येष्ठ वकील नेत्यांच्या गाठीभेटी घेत फिरत होते. त्यानंतर तीन दिवसांनी ओपी बंडाचा झेंडा घेते झाले आहेत, हे लक्षात घेण्याजोगे आहे.

अम्मांच्या पश्‍चात अण्णा द्रमुकला पाठिंबा देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. लोकसभा व राज्यसभेतले अण्णा द्रमुकचे संख्याबळ हे त्याचे पहिले कारण आणि दुसरे म्हणजे ओपी किंवा तत्सम नेत्यांच्या मार्फत तामीळनाडूतील सत्ता हस्तगत करणे हे दुसरे कारण. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ कधी दिली जाणार आहे, याची विवंचना शशिकला यांना लागली आहे, तर दुसरीकडे ही ब्याद पक्षाबाहेर कशी जाईल, याची विवंचना ओपी आणि त्यांच्या समर्थकांना लागली आहे. ओपींनी अशातच केलेली खेळी शशिकला यांना धक्का देणारी ठरली आहे. ओपींनी अम्मांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. अम्मांची भाची दीपा जयकुमार यांचा पाठिंबा मी घेणार आहे, असे सांगत ओपींनी भावनिक मुद्द्यालाही पद्धतशीर हात घातला आहे. तसेच या दीपा जयकुमार यांना पक्षाध्यक्ष करण्याचा घाटही त्यांनी पडद्याआड घातला आहे. या सर्वांमुळेच शशिकलांनी ओपींनाच पक्षातून हाकलण्याचा निर्णय घेतला. शशिकलांना हा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगत ओपी समर्थक गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून, आयोगाने शशिकला यांना नोटीस बजावली आहे. असो.

थोर नाटककार शेक्सपिअरच्या मॅक्बेथ व हॅम्लेट या नाटकांची यानिमित्ताने आठवण झाली. सत्तेसाठी हपापलेले मॅक्बेथ, लेडी मॅक्बेथ आणि संशयपिशाच्चाने झपाटलेला हॅम्लेट, अशी शेक्सपिअरची सर्व पात्रे आज तामीळनाडूच्या राजकारणात आपापली भूमिका बजावत आहेत. सत्तेच्या हव्यासापायी मॅक्बेथचा कसा अंत होतो, याची प्रचिती शशिकलांना येणार की ओपींना, हे येत्या काही दिवसांत कळेल. तथापि, सध्याची तांत्रिकता आणि केंद्रीय सत्तेच्या पाठबळाचा विचार करता शशिकलाच लेडी मॅक्बेथ ठरण्याची चिन्हे आहेत. अरुणाचलात सत्तेवर असलेला अवघा पक्षच विलीन करून घेत तेथे भाजप सत्तेवर आला होता. आता तामीळनाडूत असे चित्र दिसले, तर आश्‍चर्य वाटू नये. तामीळनाडूत शिरकावाची संधी भाजपला यानिमित्ताने मिळाली असून, द्रमुकच्या सत्तेचे मार्गही प्रशस्त झाले आहेत. थोडक्यात सांगायचे, तर तामीळनाडूतील राजकारण आता बहुपक्षीयतेचे वळण घेत असून, या वळणावरचा हा पहिला मोठा रणसंग्राम ठरणार आहे.

– गोपाळ जोशी
9922421535