हेल्मेट सक्तीचा निर्णय केवळ प्रसिद्धीसाठीच

0

कृती समिती करणार आंदोलने करून सक्तीला विरोध

पुणे : हेल्मेटसक्तीविरोधी कृती समितीने हेल्मेटला कधीच विरोध केला नाही. पण पोलिसांकडून सक्तीचे भूत पुणेकरांच्या लादले जात आहे. नवीन अधिकारी आले की हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतात. हा निर्णय केवळ प्रसिद्धीसाठी घेतला जातो. सर्वसामान्यांचे मत जाणून घेतले जात नाही. त्यामुळे आता पोलिसांना सक्तीविरोधात निवेदन दिले जाईल. त्यानंतरही सक्ती कायम ठेवल्यास रास्ता रोको, निदर्शने, सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने मंगळवारी दिला.

समितीमध्ये सर्व पक्षांच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. शहरातील रस्त्याची अवस्था, रहदारीचा वेग पाहता हेल्मेट सक्ती अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी योग्य नाही. शहराच्या रस्त्यावर ताशी 10 ते 20 किलोमीटर या वेगाने वाहन चालविली जातात. अशा परिस्थितीमध्ये हेल्मेट सक्ती कशासाठी? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून येत्या 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात मंगळवारपासून करण्यात आली. हेल्मेट न घातलेल्या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. यापार्श्‍वभूमीवर हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीची बैठक झाली. बैठकीत शांंतीलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, विवेक वेलणकर, संदीप खर्डेकर, संजय बालगुडे, शाम देशपांडे, रुपाली पाटील, मंदार जोशी, धनंजय जाधव, विश्‍वास चव्हाण, बाळासाहेब रुणवाल, गिरीश भिलारे, प्रफुल्ल देशमुख यांनी सहभाग घेतला.

बैठकीमध्ये हेल्मेटसक्तीला तीव्र विरोध करण्यात आला. त्यानंतर पुढील रुपरेषा निश्‍चित करण्यात आली. पुढील एक-दोन दिवसांत पोलिसांना हेल्मेटसक्ती न करण्याबाबत निवेदन दिले जाईल. त्यानंतरही निर्णय न बदलल्यास चौकाचौकात निदर्शने, जाहीर सभा, रास्ता रोको आणि शेवटी सविनय कायदेभंग असे टप्प्याटप्याने आंदोलने केली जातील, अशी माहिती काकडे यांनी दिली. हेल्मेटसक्तीचे भूत पुणेकरांवर लादू नका, त्यासाठी दरवेळी आंदोलन करावे लागते. पुणेकरांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, असे सुरतवाला म्हणाले. पक्षभेद विसरून सर्वांनी हेल्मेट सक्तीविरोधात रस्त्यावर उतरावे. सर्वसामान्य नागरिकांनीही कृती समितीला पाठिंबा देत सक्तीविरोधी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Copy