हेल्मेटसक्तीसाठी ‘आरटीओ’ही सरसावले

0

येत्या सोमवारपासून दुचाकीस्वारांवर कारवाई

दंडात्मक कारवाईसह परवानाही निलंबित

पुणे : हेल्मेटसक्तीच्या पोलिसांच्या निर्णयावर वाद सुरू असतानाच आता प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) कारवाईचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून हेल्मेट न घालणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईसह परवानाही निलंबित केला जाईल. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

कार्यवाहीचा वार्षिक अहवाल सादर

पोलिसांनी 1 जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी गट सक्रीय झाले असून त्याला कडाडून विरोध केला जात आहे. आता ‘आरटीओ’नेही हेल्मेट न वापरणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीपुढे रस्ते अपघात नियंत्रणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला आहे. याअनुषंगाने या समितीने दिलेल्या सुचनांनुसार केलेल्या कारवाईचा आढावा गुरुवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला.

तपासणी मोहीम राबविणार

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, वाहतुक पोलिस उपायुक्त, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. हेल्मेटसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची तपासणी मोहीम राबवून दोषी चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे तसेच वाहन अटकावून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

तर 500 रुपयांचा दंड

याआधी केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. यापुढे हेल्मेट नसल्यास 500 रुपयांचा दंड आकारून परवाना निलंबित करण्यात येईल. वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार असल्याचे आजरी यांनी सांगितले.

मागे बसलेल्या व्यक्तीसाठी हेल्मेट आवश्यक

आजरी म्हणाले, पोलिसांनी दि.1जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार हेल्मेटसह सर्वच वाहतूक नियमांबाबत सोमवारपासून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासूनच वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली जाईल. हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणारी व्यक्ती तसेच मागे बसलेल्या व्यक्तीसाठी संपूर्ण राज्यभर लागू असतील. तसेच मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्याचे आदेश सचिवांनी यावेळी दिले असल्याचे सांगण्यात आले.

समुपदेशनानंतरच मिळणार परवाना

हेल्मेट व सीट बेल्ट विषयक नियमांचा भंग केल्यास संबंधित वाहनचालकाला सुरूवातील दंड आकारून परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतर तडजोड शुल्क वसुल करण्यापुर्वी संबंधित नियमांचा भंग करणार्‍या व्यक्तीस कमीतकमी दोन तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशासाठी उपस्थित राहावे लागेल. या समुपेदशनाला उपस्थित असल्याचा पुरावा दाखविल्यानंतरच परवाना परत दिला जाईल, असे आजरी यांनी स्पष्ट केले.

Copy