हुंड्यासाठी पत्नीचे अश्‍लील फोटो पसरविण्याची धमकी

0
बावधन खुर्दमधील पती योगेश राजपुतची विकृती
विवाहात तीन लाख रोख, 14 तोळे सोने देवूनही हुंड्याची भूक
पिंपरी-चिंचवड : पत्नीकडे हुंड्याची मागणी करत तिचे आणि तिच्या भावाचे अश्‍लील फोटो बनवून ते सोशल मीडियावर टाकण्याची, तसेच पत्नीला व पोटच्या तीन वर्षाच्या मुलीला मारण्याची धमकी स्वतः पतीने दिली. हा धक्कादायक प्रकार बावधन खुर्द येथे 29 मे 2011 पासून शुक्रवार (दि. 4) या कालावधीत घडला. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती योगेश विजयसिंग राजपूत (रा. बावधन खुर्द, ता. मुळशी), विजयसिंग मानसिंग राजपूत, विकास विजयसिंग राजपूत, गायत्री विकास राजपूत (तिघे रा. वाशी, नवी मुंबई), भगतसिंग विजयसिंग राजपूत (रा. राजपूत कॉलनी, पाचोरा, जळगाव), प्रतापसिंग विजयसिंग राजपूत (रा. राजमाता जिजाऊ चौक, सिडको, औरंगाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात वर्षांपूर्वी विवाह, तीन वर्षाची मुलगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा 2011 साली योगेश याच्यासोबत विवाह झाला. विवाहावेळी फिर्यादी यांनी योगेशला हुंडा म्हणून 10 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार फिर्यादीच्या वडिलांनी तीन लाख रुपये रोख रक्कम आणि 14 तोळे सोन्याचे दागिने दिले होते. त्यानंतर देखील सासरच्या लोकांची हुंड्याची भूक भागली नाही. सर्वानी मिळून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान फिर्यादी आणि योगेश यांना एक मुलगी झाली. तरीही छळ वाढत गेला. योगेश याने फिर्यादी आणि त्यांची तीन वर्षाची मुलगी आवणी यांना ठार मारण्याची धमकी दिली.
सोशल मिडियावर टाकणार होता फोटो
तसेच आरोपींनी फिर्यादी महिलेचे त्यांच्या भावासोबत अश्‍लील फोटो तयार केले. हे फोटो फेसबुक, व्हाट्सअप या सोशल माध्यमांवर टाकण्याची वेळोवेळी धमकी दिली. तसेच लग्नाच्या वेळी दिलेले 14 तोळे सोन्याचे दागिने दिले नसल्याचे सांगितले. शारीरिक व मानसिक त्रास, जीवे मारण्याची धमकी आणि फसवणूक झाल्याने महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Copy