ही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ

0

खाकीतील योद्ध्यांनी वाढवले तरुणांचे मनोबल : गुन्हेगारी नियंत्रणासोबतच कोरोनाचाही मुकाबला

रावेर (शालिक महाजन) : संवेदनशील म्हणून पोलिस दप्तरी ओळख असलेल्या रावेर तालुक्यात आजअखेर सव्वा सातशेपार कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली असून त्यातील 527 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 47 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. कोरोनाविषयी अनाठायी असलेली नागरीकांच्या मनातील भीती पाहता प्रशासनातील अनुभवी असलेल्या पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व निरीक्षक रामदास वाकोडे यांनी नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण केली आहे. ही लढायची नव्हे तर कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ असल्याचा सकारात्मक संदेशही या अधिकार्‍यांनी वयाच्या 55 व्या वर्षात दिला आहे. गुन्हेगारी नियंत्रणासोबत सण-उत्सवाच्या काळातील बंदोबस्त व कर्मचार्‍यांचे कुटुंबाप्रमाणे काळजी घेत कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण न होण्यासाठी अधिकार्‍यांकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

कोरोना नियंत्रणासोबत गुन्हेगारीही आवाक्यात
निरीक्षक वाकडे यांचे वय 55 तर पिंगळे यांचे वय 57 आहे मात्र असे असलेतरी या अधिकार्‍यांचा काम करण्याचा उत्साह नवतरुणांला लाजवेल असाच आहे. खात्यातील अनुभवाच्या जोरावर गुन्हेगारी नियंत्रणासह कोरोनाबाबत या अधिकार्‍यांनी सकारात्मक जनजागृती करून नागरीकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या पाच महिन्यांपूुन कोरोना व गुन्हेगारी विरुध्द एकहाती खिंड हे अधिकारी लढवत असून प्रसिद्धीपासून चार हात लांबच आहेत. या अधिकार्‍यांना त्यासाठी सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम, मनोज वाघमारे व पोलिस कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभत आहे.

कोरोनाविरुद्ध अधिकार्‍यांचा लढा
निरीक्षक रामदास वाकोडे यांनी वयाच्या 55 व्या वर्षी सुध्दा दैनंदिन व्यायाम व योगासने करून फिटनेस कायम ठेवला आहे शिवाय रात्री-बेरात्री ग्रामीण भागात पेट्रोलिंग असो वा कायदा-सुव्यवस्थेची परीस्थिती वाकोडे हे खुबीने निभावत आहेत. अचानक कोविड सेंटरमधील बंदोबस्ताची माहिती तर शेरी नाका (पाल) असो की चोरवड चेक पोस्ट आदी ठिकाण ते भेटी देवून माहिती जाणून घेतात. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे देखील वयाच्या 57 व्या वर्षीही जोमात कामे करताना दिसून येतात. रावेरात घडलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले. दोघाही अधिकार्‍यांमध्ये कमालीचा समन्वय असून दोघे आपल्यापेक्षा लहान अधिकारी असो की पोलिस कर्मचारी वा नागरीक त्यांना ते कोरोनाविषयी जनजागृती करून सुरक्षित राहण्याचे आवाहन करताना दिसून येतात.

वाकोडेंचा मुलगा करतोय आयएएस तयारी
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे मुळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्या अनुभवाच्या जोरावर रावेर पोलिस स्टेशनचा गाढा ते हाकलत आहेत. वाकोडे यांना दोन मुले असुन एक दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करतो तर दुसरा पुण्यात शिक्षण घेत आहे. त्यांच्या पत्नी वाकोडे या गृहिणी असून त्या रावेरमध्येच निरीखक रामदास वाकोडे यांच्या सोबत वास्तव्याला आहेत.

पायाला चक्री लावून फिरतात 57 वर्षीय नरेंद्र पिंगळे
57 वर्षीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे हे अमळनेर तालुक्यातील असून त्यांना तीन मुले आहेत. मिसेस पिंगळे या मुलांसह नाशिकमध्ये राहतात तर पिंगळे फैजपुर येथे राहतात. दररोज पिंगळे देखील दैनंदीनी व्यायाम करून रोज यावल व रावेर तालुक्यात दौर्‍यावर असतात व गुन्हा उघड करण्या संदर्भात मार्गदर्शन करतात. पिंगळे म्हणाले की, कोरोना वगैरेला मी घाबरत नाही परंतु सुरक्षित राहण्यासाठी सर्व खबरदारी घेत असतो. नागरीकांना, पोलिसांनी नेहमी सुरक्षित अंतर ठेवूण दैनंदीन कामे करण्याच्या सूचना देत असतो.

Copy