हिवाळ्यात पावसाळा ; रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान

जनजीवणावर परिणाम होण्याची शक्यता

 

नंदुरबार – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पथारावरील मिरची झाकण्यासाठी मजुरांची धांदल उडाली आहे.
हवामान खात्यातर्फे शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने बुधवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर हा पाऊस सुरू राहिल्याने कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. मिरची पथारीवर देखील कामगाराची लगबग दिसून आली. शहराबाहेरील वळण रस्त्यावर विस्तीर्ण जागेवर मोठ्या प्रमाणावर मिरची सुकविण्यासाठी टाकण्यात आली. अवकाळी पावसामुळे मिरचीचे नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी बांधवांकडून मिरची सुरक्षेसाठी प्रयत्न करताना दिसून आले. मजुरांमार्फत पथारी वरील मिरचीवर गोणपाट आणि प्लास्टिकद्वारे आवरण झाकण्यात आले. नंदुरबार येथील लाल मिरची नजीकच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यासह देशातील विविध प्रांतात तसेच सातासमुद्रापार विदेशात देखील प्रसिद्ध आहे.

बोरदसह परिसरात अवकाळी पाऊसाच्या सरी

बोरद: बुधवार अवकाळी पावसाच्या सरी सकाळी अकरा वाजेपासून सुरू झाल्या व सायकाळी सहा वाजेपासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. बोरद, खरवड,मोड मालदा, तुळाजा परिसरात झाल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे. याचा परिणाम हा केळी, पपई,हरभरा कापूस ,मिरची ई. पिकांवर होण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक शेतकर्‍याचा वेचणी अभावी कापूस शेतातच राहिल्याने खराब होण्याची शक्यता आहे. त्यातच परिसरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकर्‍यांची ऊसतोड सुरू असल्याने परिसरातील ऊस हा समशेरपुर तसेच शहादा येथे कारखान्यात जात असतो पण पावसाच्या सरी सुरू झाल्याने प्रकाशा ते खरवड हा मुख्य मार्ग असल्याने बोरद सह परिसरातील शेतकर्‍याचे उसाचे ट्रॅक्टर याच मार्गाने जात असतात आधीच रस्ता खराब असल्याने आता पावसात मात्र चिखल होत असतो यामुळे ऊसवाहतूक करणारे वाहनांना कसरत करावी लागणार आहे. अशातच कोरोनाचे संकट पुन्हा डोके वर काढत आहे. हिवाळ्यात होणार्‍या अचानक अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे.