हिमस्खलनात दबलेल्या 5 जवानांना वाचविले

0

श्रीनगर । हिमकडा कोसळून त्या खाली दबलेल्या पाच लष्करी जवानांना अथक प्रयत्नानंतर वाचविण्यात यश आले असले तरी, त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गस्तीवर असताना या जवानांच्या पथकावर हिमकडा कोसळला होता. कुपवाडा जिल्ह्यातील मछल सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडली होती. सकाळपासून या जवानांना वाचविण्यासाठी युद्धस्तरावर मोहीम हाती घेण्यात आली होती. दरम्यान, काश्मीर खोर्‍यात जोरदार बर्फवृष्टी होत असून, त्यात आतापर्यंत 21 लष्करी जवानांसह अनेक नागरिक ठार झाले आहेत. प्रचंड हिमवादळे आणि बर्फवृष्टीतही जवान सीमेवर खडा पहारा देत आहेत.

हिमकडा कोसळून जवान दबले
लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मछल सेक्टर येथील गस्ती पथकावर शनिवारी सकाळी अचानक हिमकडा कोसळला. त्याखाली पाच जवान दबले गेले होते. त्यांना वाचविण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेण्यात आली. या पाचही जवानांना बाहेर काढण्यात आले असून, ते बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. हे जवान कित्येक खोल बर्फाखाली दबलेले राहिल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती या प्रवक्त्याने दिली.

दशकातील सर्वाधिक थंडीची लाट
दोन दिवसांपूर्वीच गुरेझ सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवरील लष्करी तळावर हिमकडा कोसळून 14 जवान मृत्युमुखी पडले होते. आतापर्यंत 21 जवान हिमपाताचे बळी ठरले असून, सात जवानांना वाचविण्यात यश आले आहे. तर अनेक नागरिकही या नैसर्गिक प्रकोपाचे बळी ठरले आहेत. गेल्या काही दशकांतील सर्वाधिक थंडीची लाट सद्या काश्मीर खोर्‍यात आली असून, दररोज हिमपाताचे प्रकार घडत आहेत. सद्या उणे सात अंशसेल्सिअस असे तापमान या भागात असून, जोरदार बर्फवृष्टी व वादळे येत आहेत. त्यामुळे सीमेवर गस्त घालणार्‍या जवानांसह स्थानिक नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.