हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येला जातो आहे-उद्धव ठाकरे

0

नवी दिल्ली – छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त हिंदूंचे दैवत आहेत. म्हणूनच शिवरायांच्या जन्मभूमीतील माती म्हणजे हिंदूंच्या भावना घेऊन मी अयोध्येला निघालो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करणार आहे. दौऱ्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आज शिवनेरी येथे जाऊन शिवरायांच्या जन्मस्थानाला भेट दिली.

प्रत्येक निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा उचलणाऱ्या भाजपालाही उद्धल ठाकरे यांनी खडेबोल सुनावले. “आणखी किती निवडणुकांमध्ये अजून हा मुद्दा घेणार आहात?, तेच विचारायला मी अयोध्येत चाललो आहे. मी अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. माझ्या अयोध्या दौऱ्यामुळे मंदिर उभारणीच्या कार्यला वेग मिळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर आल्यावर ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी शिवनेरी गडाला भेट देण्याचे ठरवले होते.

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून घमासान सुरू आहे. राम मंदिराबाबत संवाद साधण्यासाठी उद्धव यांनी पाठवलेले निमंत्रण संत-महंतांनी धुडकावून लावले आहे. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात रस असल्याचा आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी केला.

शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांपासून फारकत घेत आखाडा परिषदेने २, ५ डिसेंबर रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराचे सर्व पक्षकार एकाच व्यासपीठावर आले तर काहीतरी तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास नरेंद्र गिरी महाराजांनी व्यक्त केला.

Copy