Private Advt

हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीकडून कामगारांचा थकबाकी ‘पीएफ’ वसूल

0

तब्बल 38 कोटी रुपयांची पीएफ थकबाकी वसूल, आकुर्डी कार्यालयाची कारवाई

पिंपरी ः कर्मचार्‍यांच्या हक्काचा भविष्य निर्वाह निधी थकविणार्‍या पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक लिमिटेड कंपनीकडून तब्बल 38 कोटी रुपयांची पीएफ थकबाकी वसूल करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) आकुर्डी कार्यालयाने ही कारवाई केली आहे. पुणे विभागातील ही सर्वांत मोठी थकबाकी वसुली (रिकव्हरी) मानली जात आहे.
कर्मचार्‍यांचा पीएफ भरण्यास टाळाटाळ करणार्‍या कंपन्यांकडून थकबाकी वसुलीची मोहीम पिंपरी कार्यालयाने हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीकडून ही वसुली करण्यात आली आहे. याशिवाय अन्य दहा कंपन्यांकडूनही दहा कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

38 कोटी रुपयांची वसुली…
हिंदुस्थान अँटीबायोटिक कंपनीने गेल्या दहा वर्षांपासून एक हजार कर्मचार्‍यांचा पीएफ भरला नव्हता. त्यामुळे पीएफची थकबाकी 67 कोटी रुपयांवर पोहोचली होती. त्यासाठी पीएफ कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावा केला जात होता. अखेर कार्यालयाने डिसेंबर 2019 मध्ये केलेल्या कारवाईत 6 कोटी 50 लाख रुपये, तर जानेवारी 2020 मध्ये केलेल्या कारवाईत 31 कोटी 50 लाख रुपये, अशी एकूण 38 कोटी रुपयांची वसुली केली. उर्वरित 29 कोटी रुपये फेब्रुवारी-मार्चमध्ये वसूल केले जाणार असल्याचे आकुर्डी विभागाचे पीएफ आयुक्त अमिताभ प्रकाश यांनी सांगितले.


‘ईपीएफओ’च्या आकुर्डी कार्यालयाने हिंदुस्थान अँटीबायोटिक लिमिटेड कंपनीकडून डिसेंबर-जानेवारीमध्ये केलेल्या कारवाईत 38 कोटी रुपये वसूल केले असून, पुणे विभागात प्रथमच इतकी मोठी थकबाकी वसूल झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र केली जाणार आहे. कर्मचार्‍यांचा पीएफ भरण्यास टाळाटाळ करणार्‍या कंपन्यांनी तत्काळ थकबाकी जमा करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– अमिताभ प्रकाश, पीएफ आयुक्त, आकुर्डी विभाग