हिंदुत्ववाद्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका!

0

भारिपचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला गौप्यस्फोट

मुंबई : भिमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे यांचे समर्थक असलेल्या हस्तकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बुधवारी मुंबईत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. सरकारचे कोणतेही नियंत्रण नसलेल्या हिंदुत्ववादी संघटनांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले. फेसबुकवर मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचे आवाहन केल्याचे सांगत त्या करणाऱ्या फेसबुकवरील पोस्टही प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांना दाखवल्या. रावसाहेब पाटील असे हस्तकाचे नाव असून त्याने १ जानेवारीला फेसबुकवर एक पोस्ट टाकली असून, या पोस्टनुसार मुख्यमंत्र्यांसह गिरीश बापट व सुधींद्र कुलकर्णी यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

पोलिसांनी माहिती लपविल्याचा आरोप
मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याच्या अशा पोस्टबद्दल पुण्याच्या पोलिस आयुक्तांपासून गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना माहिती असूनही जाणिवपूर्वक पोलिसांकडून ही माहिती मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आली नसल्याचा धक्कादायक आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. अशा पोस्ट करणा-या विरोधात त्वरीत कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. ही माहिती पुणे पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पुण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना आहे असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

काय आहे ती पोस्ट
कोरेगाव-भीमा येथे मोठ्या प्रमाणात कत्तली करण्याचे आणि त्यानंतर तिथे जर काही डोके कमी पडले तर मंत्री गिरीश बापट, सुधींद्र कुलकर्णी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही बिनधास्त कापू शकता, माझी काही हरकत नसेल हे लोक देशाला आणि महाराष्ट्राला लागलेली कीड आहेत, अशी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट रावसाहेब पाटील या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी टाकली आहे.

भिडे-एकबोटेवर कारवाई करा
सरकारने आत्तापर्यंत कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ३००० जणांवर कारवाई केली आहे. कोंबिग ऑपरेशन थांबविण्याचे मुख्यमंत्र्यानी आदेश दिलेले असतानाही भिवंडी, निलंगा, कंधार, नांदेड, पुणे आदी ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असून या कोंबिंग ऑपरेशन विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. सरकारने भिडे-एकबोटेवर लवकर कारवाई केली नाही तर आपण लवकरच दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याचा इशारा आंबेडकर यांनी दिला.

Copy