हा तर महाराष्ट्राने भाजपच्या कामावर दाखवलेला विश्वास : फडणवीस

0

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील मिळालेले प्रचंड यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईकर जनतेने दिलेला आशीर्वाद आहे, असे सांगत आजचा निकाल म्हणजे महाराष्ट्राने भाजपच्या राज्यातील कामावर दाखवलेला विश्वासच आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत केला.

मुंबईसह राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचे कल समोर आल्यानंतर मुंबईत दादरच्या वसंतस्मृती या मुख्यालयात मुख्यमंत्री भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवात सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

एखाद्या निवडणुकीत परफॉर्ममन्स चांगला असतो-नसतो. मात्र, राजीनामा मिळाला तरी तो स्वीकारणार नाही, असे पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिकेत सत्ता संपादनासाठी पुढे काय करायचे याचा निर्णय आम्ही लवकरच कोअर कमिटीत घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत प्रचंड यश मिळाले. पारदर्शी अजेंड्यावर मत मागितले, त्याला जनतेने समर्थन दिले. मुंबईत 195 जागा लढलो व 82 जागा मिळाल्या. नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे. नागपूर, अकोला, अमरावती, जळगाव, सोलापूर, नाशिकमध्येही आम्ही जिंकलो आहोत. महापालिकेच्या 1066 जागांपैकी 521 जागांवर विजय मिळवला असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. जळगावात एकहाती सत्ता आणली तर लातूर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातही भाजप पोहोचला. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली असल्याचेही फडणवीस म्हणाले.