हार्दिक दबावतंत्र

0

हार्दिक पटेलने गुजरातेत आंदोलन छेडले. तेथे त्याला मोठा प्रतिसाद मिळाला हे खरे. परंतु, त्याचे फार मोठे पडसाद मुंबईतील गुजराती समाजात उमटल्याचे दिसून आलेले नाही. दुसरा भाग म्हणजे मुंबईतील गुजराती समाजातून मोदींना मिळणारा पाठिंबा आणि हार्दिकला मिळणारा पाठिंबा याची तुलनाच होऊ शकत नाही.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत घमासान होणार याचा अंदाज सर्वांनाच होता. तसे ते घमासान आता सुरूही झाले आहे. किंबहुना या दोन पक्षांतील सुंदोपसुंदीमुळे राज्याला मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जावे लागणार की काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. भाजप व शिवसेनेतील मनभेदाची दरी आता इतकी रुंदावली आहे, की केवळ सत्तेमुळेही ती भरून निघण्याची शक्यता कमी आहे. गुजरातमधील पाटीदार समाजातून पुढे आलेला तरुण नेता हार्दिक पटेल याला जवळ करत शिवसेनेने भाजपवर दबावाचा प्रयत्न चालवला आहे. तथापि, हे बुमरँग उलटूही शकते, याचे भान शिवसेनेला नाही आणि अशा सुंदोपसुंदीमुळे आपलेही मोठे नुकसान होत असल्याचे भान भाजपलाही राहिलेले नाही.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्वपक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या पावलावर पाऊल टाकत मुंबईत शिवसेनेला गेल्या वर्षभरापासून अंगावर घेण्यास सुरुवात केली होती. शेलार यांचे हे प्रयत्न मातोश्रीला मान्य होणारे नव्हतेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात फारशी कटुता नाही, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात होते. त्यात तथ्य होतेही. परंतु, मुख्यमंत्र्यांना शेलारादी प्रभुतींना वेसण घालता आली नाही, हेही तितकेच खरे. परिणामी, सत्तेत भागीदार असलेल्या या दोन पक्षांमधील मतभेदांचा परिणाम मनभेदांत होत गेला आणि त्याची परिणती अडीच दशके असलेली युती तोडण्यात झाली. पक्षांची युती होणे आणि तुटणे स्वाभाविक आहे. अशा अनेक युती आणि आघाडी होण्याचे आणि तुटण्याचे अनेक प्रसंग देशातील मतदारांनी पूर्वीही अनुभवले आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपची युती तुटल्याने कोणालाही धक्का बसलेला नाही. दोन्ही पक्षांत सौख्य, सामंजस्य नसल्याचे वास्तव या पक्षांआधी मतदारांनीच स्वीकारलेले असल्याने युती तोडण्याच्या घोषणेचे भावनिक भांडवल करणे या दोन्ही पक्षांनाही अवघड होते. शिवसेनेला त्याची प्रकर्षाने जाणीव झाल्यानेच बहुधा हार्दिक पटेलांना मातोश्री वारी घडवली गेली असावी.

मुंबईतील गुजराती समाजाच्या मतदारांना आपलेसे करण्याचा हा हार्दिक मार्ग लाभदायक ठरेल, असे शिवसेनेला का वाटले असावे, हा प्रश्‍नच आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने शिवसेनेने हार्दिकला जवळ केले असावे. पण इथेच खरी मेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजराती समाजातील स्वीकारार्हता आजही कायम आहे. हार्दिक पटेलने गुजरातेत आंदोलन छेडले. तेथे त्याला मोठा प्रतिसाद मिळाला हे खरे. परंतु, त्याचे फार मोठे पडसाद मुंबईतील गुजराती समाजात उमटल्याचे दिसून आलेले नाही. दुसरा भाग म्हणजे मुंबईतील गुजराती समाजातून मोदींना मिळणारा पाठिंबा आणि हार्दिकला मिळणारा पाठिंबा याची तुलनाच होऊ शकत नाही. गुजरातेत हार्दिकमागे उभा राहिलेला पटेल समाज मुंबईत शिवसेनेच्या मागे जाईल, असे मानणे हे राजकीय दुधखुळेपणाचे ठरेल.

यात आणखीही एक वैचारिक मुद्दा आहे. पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर हार्दिकचे आंदोलन उभे होते आणि याच मुद्द्यावरून त्याने पंतप्रधानांच्या गुजरातेतील एकछत्री वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यात मुद्दा इतकाच, की आरक्षण या एकाच मुद्द्यावर हार्दिकचे नेतृत्व उभे आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर आरक्षणाला विरोध केला होता. आरक्षण नकोच, अशी त्यांची भूमिका होती आणि त्यातही द्यायचेच झाले, तर ते जात-पात-धर्माधारित नको, तर आर्थिक निकषांवर दिले जावे, असे ते म्हणत होते. आजच्या शिवसेना नेतृत्वाला ही भूमिका मान्य आहे का? की आता शिवसेना आपली भूमिका बदलणार आहे? गुजरातच्या निवडणुकीत उतरून हार्दिक पटेलला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणण्याचा मनोदय व्यक्त करणार्‍या शिवसेनेला आज ना उद्या याचे उत्तर द्यावेच लागणार आहे. महाराष्ट्रात एक आणि गुजरातेत एक, अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेला घेता येणार नाही आणि राजकीयदृष्ट्याही ती परवडणारी नाही.

राहता राहिला प्रश्‍न राज्यात मुदतपूर्व निवडणुका होणार का, हाच. मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता आल्यास शिवसेना सत्तेतील भागीदारी कायम ठेवेल आणि तसे न झाल्यास शिवसेना केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडून भाजपलाच अंगावर घेईल, असे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व दूरदृष्टीचे नेते म्हणून सर्वांना परिचित असलेले शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांनी अलीकडेच ही शक्यता वर्तवली आहे. आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडेच राहणार असल्याचे मुख्यमंत्री यातून सूचित करत आहेत का? की अन्य पक्षांतून आधीच रसद मिळवल्याचे ते सूचित करत आहेत? निकालाचे घोडामैदान जवळच आहे. तूर्तास हार्दिक दबावतंत्राचे परिणाम काय होत आहेत, हे पाहणे अधिक संयुक्तिक ठरेल.