हाडाखेड चेकपोस्ट मार्गाने नागरिकांची वर्दळ सुरूच

0

शिरपूर:मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वरील तालुक्यातील हाडाखेडमार्गे रोज शेकडो नागरिकांची महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश राज्यातून वर्दळ सुरूच आहे. तसेच हाडाखेड, सांगवी, पळासनेर ही सर्व गावे महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश राज्यालगत सीमावर्ती भागाजवळ येतात. त्यामुळे नागरिक सतत ये-जा करत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. धुळे जिल्ह्यातही 24 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहे. देशात दळणवळण बंद झाल्याने अनेक ठिकाणी कामावर गेलेले आहे. तेथेच नागरिक अडकून पडले आहेत. धुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे, मुंबई येथे नोकरी व कामानिमित्त गेले होते. तसेच कोरोना विषाणुंच्या संसर्गाने होणार्‍या कोविड 19 या साथ रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू आहे. जिल्हाधिकारी, धुळे यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून जिल्ह्यातून कोणत्याही नागरिकास गावात प्रवेश देऊ नये. नागरिकांनीही प्रवेश करू नये व केल्यास प्रशासनास लपवून ठेवू नये. मात्र, हाडाखेड गावातून मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून मध्यप्रदेशकडे ये-जा करणार्‍यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. जिल्ह्यात 144 लागू असतांनाही लोक ये-जा करीत आहेत.

नियमांचे उल्लंघन करुन वर्दळीत वाढ
त्यातील काही नागरिकांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले असतांनाही सर्व नियमांचे उल्लंघन करून हाडाखेड चेकपोस्ट येथून दिवसभरातून शेकडो नागरिक पायी अथवा मिळेल त्या वाहनाने तसेच सायकलच्या आधारे अथवा मोटरसायकलच्या साहाय्याने नागरिक ये-जा करीत आहे. मध्यप्रदेशातून तसेच गुजरात येथे कामाला गेलेल्या नागरिकांची ये-जा करणार्‍यांची संख्या लक्षणिय वाढली आहे. हे रस्ते सील करूनही लोक शेतातील रस्त्याने मिळेल त्या साधनांनी घरचा रस्ता गाठत असल्याचे चित्र आहे.