Private Advt

हरीयाणातील शस्त्र तस्कर नरडाणा पोलिसांच्या जाळ्यात : चार गावठी कट्टे जप्त

धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले कारवाईचे कौतुक : शस्त्र तस्करी ऐरणीवर

धुळे : राजस्थानातील शस्त्र तस्करास नरडाणा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली असून संशयीतांच्या ताब्यातून चार गावठी कट्टे, पाच जिवंत काडतूस व मॅग्झीन जप्त करण्यात आल्याने शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. शक्तिसिंग सुरेशकुमार (31, गांगटान, डिगल, ता.बेरी, जि.झज्जर, हरीयाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून नरडाणा पोलिसांची कारवाई
नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे यांना दोन संशयीत भाषी गावाच्या बसस्थानक परीरसरात गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धाव घेत एका संशयीताला ताब्यात घेतले तर दुसरा संशयीत पसार झाला. ताब्यात घेतलेल्या संशयीताची चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव शक्तिसिंग सुरेशकुमार (31, गांगटान, डिगल, ता.बेरी, जि.झज्जर, हरीयाणा) सांगितले तर दुसरा पसार साथीदार कपिल जाट असल्याची कबुली दिली. संशयीताच्या बॅगमधून पोलिसांना चार गावठी कट्टे, पाच जिवंत काडतूस व पाच मॅग्झीन मिळून एक लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार प्रकाश माळी, हवालदार सचिन सोनवणे, नाईक बापू बागले, नाईक सचिन माळी, नाईक विजय पाटील, ग्यानसिंग पावरा, सुरेंद्र खांडेकर, गजेंद्र पावरा, अर्पण मोरे आदींनी ही कारवाई केली.