हरिहरेश्वर, दिवेआगार किनार्‍यांवरील मोहीमेला यश

0

पुणे : वनविभागाच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनार्‍यावर सागरी कासव संवर्धन मोहीम सुरु करण्यात आली असून, सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या सहकार्यातून सुरु झालेल्या या मोहिमेला सध्या चांगले यश मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत दिवेआगर समुद्रकिनार्‍यावरून सुमारे दीडशेहून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सुखरुप सोडण्यात यश आले आहे.

भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या सागरी कासवांच्या प्रजाती दिसून येतात. यापैकी प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या चार प्रकारच्या सागरी कासवांच्या प्रजातीचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन प्रकारच्या सागरी कासवांचे अस्तित्त्व दिसून येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे या कासवांचे अस्तित्व धोक्यात आले होते.

वनविभाग, सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने उपक्रम
समुद्र किनारपट्टी भागात वाढणारे प्रदूषण, मासेमारी करताना जाळ्यात अडकून होणारा कासवांचा मृत्यू, कासवांची होणारी तस्करी आणि अंडी खाल्ल्यामुळे कासवांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वनविभाग तसेच सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहिम हाती घेण्यात येते. याचाच एक भाग म्हणून यावर्षी हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनार्‍यावर सागरी कासव संवर्धन मोहीम राबविण्यात आली. रोहा वनविभागाच्या पुढाकाराने यावर्षी दिवेआगर समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या सागरी कासवांची सुमारे साडेतीनशे ते चारशे अंडी संवर्धन करून ठेवण्यात आली होती. जवळपास दिड महिन्यानंतर यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्यास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी संध्याकाळी यातून 41, तर दुस़र्‍या दिवशी सकाळी 76 कासवांची पिल्ले अंड्यामधून बाहेर पडली आहेत. आतापर्यंत जवळपास दीडशे कासवांचीं पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली आहेत. येत्या 15 ते 20 एप्रिलपर्यंत उर्वरित अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.

300 ते 400 कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडणार
वनविभागाने सुरु केलेल्या या कासव संवर्धन मोहिमेला आता स्थानिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून कासव संवर्धनासाठी आता सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. कासवांची अंडी संकलित करून ती संरक्षित केलेल्या ठिकाणी आणून देत आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून दिवेआगर येथे यावर्षी तीनशे ते चारशे कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात येणार आहे.