हरिविठ्ठल नगरातून गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतुस जप्त

0

जळगाव :- शहरातील हरिविठ्ठल नगरात सोमवारी मध्यरात्री वादात २ पिस्तुल निघाल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार रामानंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी संयुक्त कारवाई करून हरिविठ्ठल नगरातील एका घरातून १५ हजार किमतीचे गावठी पिस्तुल व ४ हजार रुपयांचे चार पितळी जिवंत काडतुस असा १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे . विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगणारे संशयित फरार झाले आहेत .

हरिविठ्ठल नगरातील बाजारपट्टा परिसरात राहणाऱ्या संतोष ज्ञानेश्वर पाटील व योगेश ज्ञानेश्वर पाटील या दोघा भावंडांकडे दोन पिस्तुल गावठी पिस्तुल तसेच जिवंत काडतुसे असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली . त्यानुसार त्यांनी याबाबत पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना सूचना केल्या . रोहन यांनी रामानंदनगर पोलीस तसेच स्थानिक गुन्हेशाखेला कारवाईचे आदेश दिले .

घरात तपासणी ; किचनमध्ये आढळले पिस्तुल

माहितीनुसार बुधवारी सकाळी रामानंदनगर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, कर्मचारी विश्वनाथ गायकवाड, सतीश डोलारे , तुषार विसपुते, दिव्या छाडेकर , संतोष पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश मेढे संजय हिवरकर, प्रमोद
लाडवंजारी यांनी हरिविठ्ठल नगर गाठले . कर्मचाऱ्यांनी माहितीनुसार संतोष पाटील यांच्या घरात तपासणी केली. तपासणीत घरात किचनमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाच्या वर एका बॉक्समध्ये गावठी पिस्तुल आढळले . त्यात चार जिवंत काडतुसेही मिळाले . तर दुसरी एक प्लास्टिकचे खेळणे असलेली बंदूकही मिळून आली .

दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल ; दोघेही फरार

चौकशीत गावठी पिस्तुल बाबतचा कुठलाही परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त केले असून या प्रकरणी संतोष ज्ञानेश्वर पाटील व योगेश ज्ञानेश्वर पाटील या दोघां भावंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असून पोलीस दोघासह आणखी एक गावठी पिस्तुलाचाही शोध घेत आहे .

Copy