‘हरि’नामाचा गजर, टोलेबाजी आणि गोंधळात सादर केला अर्थसंकल्प

0

मुंबई : राज्यातील कर्जपिडीत शेतकऱ्यांमागे हे सरकार खंबीरपणे उभे असून त्यांच्यासाठी विविध योजना प्रस्तावित आहेत. आघाडी सरकारने जर त्यांच्या काळात कृषीपंपासाठी तरतूद केली असती तर घसा कोरडा पडेपर्यंत विरोधकांना ओरडावे लागले नसते. जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा ते मस्तीत होते असा टोला लगावतानाच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत राज्याचा वर्ष २०१७ – १८ चा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभेच्या कामकाजामध्ये आजही विरोधकांनी गोंधळ घातला होता. सकाळी गोंधळामुळे काहीही कामकाज होऊ शकले नाही. 2 वाजेपर्यंत सभागृह स्थगित ठेवल्यानंतर अर्थसंकल्पास सुरुवात झाली.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असतानाही विरोधकांची शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गोंधळी भुमिका कायम होती. विरोधकांनी आज टाळ वाजवित माऊलीचा, हरिनामाचा गजर सुरु केला. विठ्ठल नामाचाही अधून मधून गजर सुरु होता. गणपतीच्या आरत्या आणि घालीन लोटांगणसह शिमग्याच्या बोंबाही मारण्यास सुरवात केली होती. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांन वारंवार तंबी देऊनही हे सदस्य जागेवरुन काही हटत नव्हते.काही सदस्यांनी हातामध्ये आश्वासनाचे गाजर असे बॅनर घेऊन सभागृहात प्रवेश केला होता. अर्थमत्र्यांचे भाषण सुरु असताना त्यांच्यासमोर नेऊन ते फडकवित होते. सभागृहात गोंधळ सुरु असूनही अर्थमंत्र्यांनी आपले संयमित भाषण सुरुच ठेवले. मात्र, अधूनमधून विरोधकांना टोले लगावण्याची संधीही त्यांनी सोडली नाही.

– टोलेबाजी करत भाषणास सुरुवात

भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी
मुश्किले जरुर है, मगर ठहरा नही हू मै !
मंजिल से जरा कह दो, अभी पहूंचा नही हूँ मै !
कदमो को बांध न पाएगी मुसिबत की जंजिरे,
रास्तों से कह दो अभी भटका नही हूँ मै ! असा शेर म्हणत अर्थसंकल्पिय भाषणास सुरवात केली. यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांंच्या विकासासाठी भाजप – शिवसेना सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ही शिवसेनेची मागणी होती. त्याचा संदर्भ धरुन ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची थकीत कर्ज संपवावे, सातबारा कोरा करावा ही सरकारचीही भूमिका आहे. शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी राज्यातील गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असून अशीच प्रगती राहिली तर विरोधक एक – दोन मतदारसंघातून निवडून येतील, असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावला. तसेच, आमचे लाल दिव्यावर नाही तर लाल रक्ताच्या माणसावर प्रेम आहे असे सांगण्यासही ते विसरले नाही.
बळीराजासाठी आता एकच आहे आस,
त्यांच्या अंगणी उभी रहावी धान्याची रास,
असे सांगत त्यांनी राज्याच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असे अभिवचन दिले.

हास्याच्या लहरींनी सभागृह खुलले

अर्थसंकल्पातील भाषणात अर्थमंत्र्यांनी देशी व विदेशी मद्यावरील कमाल विक्रि किमतीवर मूल्यवर्धित कराचा दर २३.०८ टक्क्यावरुन २५.९३ टक्यांपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे जाहिर केले. हे जाहिर करत असताना सभागृहा गोंधळ घालणारे सदस्य काही वेळ शांत राहिले होते. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी अर्थमंत्री तुम्ही बोलणे सुरु ठेवा. आता, गोंधळ होत नाही. असे सांगितल्याने सभागृहात हास्याचा फवारा उडाला. खुद्द अर्थमंत्री मुनगंटीवारही आपले हसू आवरु शकले नाही. प्रत्येक मुद्दा सांगत असताना अर्थमंत्र्यांनी अगदीच मिश्किल शैलीत विरोधकांवर टोमणा मारण्याचा एकही चान्स सोडला नाही. विरोधकांची अशीच प्रगती राहिली तर आगामी विधानसभेत 2-3 च दिसतील असे अर्थमंत्री म्हणाले. तसेच वळसे-पाटील यांना उद्देशून तुमची नार्को टेस्ट केली तर तुम्ही यांच्यासोबत नाहीत अशी खोचक टिपण्णीही अर्थमंत्र्यांनी केली, यावेळी स्वतः वळसे पाटील देखील हसू आवरू शकले नाहीत. अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक टोल्याला भाजप आणि शिवसेनेचे सदस्य डेस्क वाजवून दाद देत होते.

विरोधकांकडून अर्थसंकल्पाची होळी
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षाने सभागृहाबाहेर अर्थसंकल्पाची होळी केली. सरकार आणि अर्थसंकल्प बोगस असल्याची घोषणाबाजी करत विरोधी पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्पाची होळी केली. यावेळी देखील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आपली कर्जमाफीची भूमिका कायमी ठेवली. शेतकऱ्यांना तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगत विरोधकांनी नारेबाजी केली.