हरित सेना योजनेत सदस्य नोंदणी करा

1

धुळे : वन विभागाच्या `महाराष्ट्र हरित सेना` या योजनेच्या संकेतस्थळावर सदस्य म्हणुन नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोह्यो) शुभांगी भारदे यांनी केले आहे. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्याबाबत कृती कार्यक्रम तयार करुन अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. `महाराष्ट्र हरित सेना` स्थापित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नोंदणीसाठी संकेतस्थळाची निर्मिती

त्या अनुषंगाने महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर दिनांक ३१ मार्च २०१७ पर्यंत किमान १ कोटी लोकांनी, स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून या उपक्रमाचे सदस्य म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. ग्रीन आर्मीचे सदस्य असलेल्या सभासदांना वृक्ष लागवड, संगोपन, वन व वन्यजीव आणि वन विभागातील संबंधित क्षेत्रामध्ये आपले योगदान देता येईल. तसेच या उपक्रमात उत्तम काम करणाऱ्या सभासदांना बक्षिस योजना व इतर सवलतीद्वारे सन्मानित करण्याची योजना विचाराधीन आहे. नोंदणीची पद्धत अत्यंत सोपी असून वर नमूद संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती भरल्यानंतर सभासद नोंदणी झाल्याचे आणि त्यानुसार प्रमाणपत्र सिस्टिममध्ये तयार होऊन सदस्याचा मेल आयडीवर आणि एसएमएस वर पाठविले जाईल. जिल्हयातील विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी, त्यांचे कुटुंबिय, आप्तेष्ट, मित्र परिवार, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय आणि खाजगी संस्था यांनी महाराष्ट्र हरित सेनेमध्ये सदस्य नोंदणी केल्यास त्यांना अशा उपक्रमात काम करण्याची संधी मिळेल असे भारदे यांनी सांगितले.