हनुमंतखेडा येथील युवकाचा वीज पडल्याने मृत्यू

पाचोरा : तालुक्यातील हनुमंतखेडा येथील 20 वर्षीय युवकाचा शेतात काम करत असतांना अचानक वीज पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. किशोर परशराम पवार (20) असे मयत तरुणाचे नाव आहे.

शेतात ओढवला मृत्यू
हनुमंतखेडा, ता.सावखेडा येथे शुक्रवार, 24 जुन रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर हनुमंतखेडा येथील तरुण किशोर परशराम पवार (20) हा त्याच्या शेतात कपाशी पिकास सर्‍या पाडण्याचे काम करीत होता व पावसापासून बचावासाठी काही वेळेनंतर काका व चुलत भाऊ काही अंतरावर गेले व त्यानंतर सिसम झाडावर वीज पडल्याने किशोर पवारचा मृत्यू झाला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी किशोर पवार यास मृत घोषित केले.

पाचोरा पोलिसात नोंद
मयत किशोर परशराम पवार याच्या पश्चात्य आई, वडिल, दोन भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ही नोंद शुन्य क्रंमाकाने सोयगाव पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली.