Private Advt

हतनूर जलाशयावर स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या घटली

वातावरणातील बदलामुळे हतनूर जलाशयावर प्रामुख्याने पाहिला जाणारा ‘मोठा लालसरी’ यंदा दिसेनासा

खिर्डी (सादिक पिंजारी) : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण जलाशयाच्या परीसरात हिवाळ्यामुळे देशी-विदेशी पक्ष्यांची शाळा भरली असलीतरी यंदा मात्र देश-विदेशातून हजारोंच्यावर स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या वातावरणातील बदलामुळे निम्मेवर आली आली आहे. पक्षी निरीक्षणासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य पक्षी निरीक्षण करतात.

वातावरणातील बदलाचा फटका
हतनूर जलाशयाच्या दलदलीमुळे हिवाळ्यात पक्ष्यांसाठी विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असल्याने हिवाळ्यात पक्षी विश्व अवतरते माच्त्र हिमालय, तिबेट, यूरोप, रशिया, मंगोलिया, बलूचिस्तान, सैबेरीया, उत्तर भारत व पाकिस्तान भागातील स्थलांतरीत पक्ष्यांचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे अर्थात वातावरणातील बदलामुळे हे घडल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि हवामानात होणारे बदल नैसर्गिक बदलाचे भाकीत पक्षांना आधीच समजत असल्याने त्यांची संख्या घटल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले. जास्त आकर्षित करणारा पक्षी मोठा लालसरी, सोबत वारकरी, गढवाल, थापाट्या, शेंडी बदक, चक्रवाक, भोराडी, तलवार बदक, नकटा असे बरेच पक्षी मोजक्या संख्येने दाखल झाले आहेत.

मोठा लालसरी यंदा दिसेनासा
यंदा हतनूर जलाशयावर प्रामुख्याने बघितला जाणारा मोठा लालसरी यंदा दिसेनासा झाला आहे. पक्षी मित्र पार्थ बर्‍हाटे यांच्या निरीक्षणात 8 ते 10 संख्येने ते दिसून आले तर मागील वर्षी जास्तीच्या संख्येने हे पक्षी आल्याचे पक्षी अभ्यासक उदय चौधरी यांनी सांगितले. हतनूर धरण परिसरातील नदीपात्रात बोटींमध्ये भ्रमंती करुन दुर्बीणी व कॅमेर्‍यासारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षांचा अभ्यास केला जातो. चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव परीसर ही गेल्या 12 वर्षांपासून देशी-विदेशी पक्ष्यांचे निरीक्षण व अभ्यास सातत्याने करीत आहे.

‘रामसर’ दर्जाची प्रतीक्षा
हतनूर धरण परीसरातील पक्षी गणना करत जैव विविधतेची माहिती चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन व सचिव उदय चौधरी, समीर नेवे, सत्यपालसिंग राजपूत, विलास महाजन, पार्थ बर्‍हाटे, पियूष महाजन यांनी दिली व प्रामुख्याने हतनुर जलाशय रामसर दर्जाच्या प्रतीक्षेत असून वनाधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही पक्षी अभ्यांसकानी सांगितले. वर्षभरात अनेक विविध संस्थांचे पक्षी अभ्यासक येथे पक्षी निरीक्षण करण्यासाठी येत असतात.

रामसर दर्जाबाबत घ्यावी दखल : अनिल महाजन
हतनूर जलाशय पक्षी अभ्यासक, पक्षी निरीक्षण छायाचित्रकार यांच्यासाठी पर्वणी असते परंतु यंदा पक्ष्यांची संख्या सर्वत्र कमी प्रमाणत आहे. पाण्याची पातळी सर्वत्र जास्त असल्याने पक्षी संख्या घटली आहे. या महत्वपूर्ण जलाशयाकडे वरीष्ठ अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष होत असल्याने रामसर दर्जाचा प्रश्न प्रतीक्षेतच असल्याचे वरणगाव चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक अनिल महाजन म्हणाले.